पुणे – हॅप्पी बर्थडे मोदी जी असा संदेश देत हजार ड्रोनरूपी तारका आकाशात झळकताना पाहून पुणेकरांच्या डोळ्याचे पारणे फिटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृतमहोत्सवी म्हणजे ७५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पनेतून या ड्रोन शोचे आयोजन एसपी महाविद्यालयाच्या मैदानावर केले होते.
तीन किमी परिसरातही हा शो दिसणार असे मोहोळ यांनी जाहीर केले होते. त्यामुळे मैदानावर जेवढी गर्दी होती, तितकीच गर्दी मैदानाच्या चारही दिशांना होती.

लोक रस्त्यावर आकाशातील हा शो पहात होते. महाराष्ट्रात अशाप्रकारच्या शो चे पहिल्यांदाच आयोजन केले होते.जागतिक पटलावर पोहोचलेला पुण्यातील गणेशोत्सव याचे प्रतिक म्हणून गणपती बाप्पा, मराठीजनांचे दैवत असलेले संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज, महाराष्ट्राची अस्मिता असलेले छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छबी ड्रोनमधून सादर करण्यात आल्या. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची १२ वर्षांची पंतप्रधानपदाची कारकीर्द, त्यांनी घेतलेले मोठे, ठळक आणि धाडसी निर्णय याचे चित्ररूप आकाशात ड्रोनने रेखाटले.

विकसित भारत, आत्मनिर्भर भारत, राममंदिर, स्वच्छ भारत अभियान, नोटबंदी, जागतिक योग दिवस, मोदी यांचा त्यांच्या आईबरोबरचा हृदय संवाद, ग्यारह साल बेमिसाल, राममंदिर, संपूर्ण भारताचा नकाशा, पुलवामा हल्ल्याला दिलेले उरीतील सर्जिकल स्ट्राइक हे उत्तर आणि पहलगाम हल्ल्याला दिलेले ऑपरेशन सिंदूर हे उत्तर, मंगलयान मिशन, मेक इन इंडिया आणि कॉमन मॅनच्या आवाक्यातील विमान प्रवास आणि मोहोळ यांची स्वत:ची छबी या सगळ्या गोष्टी आकाशात रेखाटण्यात आल्या होत्या.

