मुंबई : आज प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी शिवाजी पार्क परिसरात माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेचा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तीव्र निषेध नोंदवत संताप व्यक्त केला आहे.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, माँसाहेब मीनाताई ठाकरे आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्याबद्दल महाराष्ट्राच्या आणि शिवसैनिकांच्या मनामध्ये नितांत आदर आणि श्रद्धा आहे. अशा वेळेस पुतळ्याची विटंबना करणारा हा समाजकंटक विकृत आणि असमंजस प्रवृत्तीचा आहे. अशा कृत्याला कोणत्याही प्रकारे समर्थन देता येणार नाही.”
याप्रकरणी डॉ. गोऱ्हे यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती यांच्याशी संपर्क साधला असून पोलिसांनी तातडीने तीन पथके स्थापन करून तपास सुरू केला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम २९८ अंतर्गत गुन्हा दाखल करून दोषींपर्यंत लवकर पोहोचले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“या प्रसंगी संयम आणि विवेकाने वागणे आवश्यक आहे. माँसाहेबांनी शिकवलेल्या मूल्यांचा आदर राखून आपण या विकृतांच्या हातात नेतृत्वाची सूत्रे जाऊ देऊ नयेत,” असेही उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

