मुंबई : विचारवंत, लेखक, पत्रकार आणि समाजसुधारक प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या १४०व्या जयंतीनिमित्त आज विधिमंडळात त्यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे, विलास आठवले, कर्मचारीवर्ग आणि आमदार उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रबोधनकारांच्या कार्याचा गौरव केला. समाजातील जातीयता, विषमता आणि अन्यायकारक प्रथांविरोधात त्यांनी सतत संघर्ष केला. सत्यशोधक विचारांचा पुरस्कार करून त्यांनी लोकांमध्ये जागृती निर्माण केली. मानवी हक्कांचे उल्लंघन जिथे-जिथे झाले, तिथे त्यांनी आधुनिक व प्रबोधनकारी हिंदुत्वाची बाजू मांडली, असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.
प्रबोधनकार ठाकरे हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे कट्टर समर्थक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त महाराष्ट्र समितीची कामे प्रभावीपणे पार पडली. “शिवसेना” हे नाव प्रबोधनकारांनीच दिले, ही ऐतिहासिक बाब त्यांनी विशेषत्वाने नमूद केली.
यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी राज्य सरकारने नुकताच सामाजिक न्याय विभागामार्फत मागास व इतर मागास समाजासाठी शिष्यवृत्तीत केलेली वाढ अधोरेखित केली. हा निर्णय सामाजिक न्यायाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असून तो म्हणजे प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांना दिलेले खरीखुरे अभिवादन आहे, असे त्यांनी सांगितले.
शेवटी, प्रबोधनकारांच्या विचारांचा वारसा जपत समाजकार्यासाठी पुढेही सक्रिय राहण्याचा निर्धार डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

