श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या जेधे महाविद्यालयातर्फे आयोजन
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना व श्री शिवाजी मराठा सोसायटीचे समाजभूषण बाबूराव ऊर्फ अप्पासाहेब जेधे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सृजनरंग’ जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पुणे व पिंपरी चिंचवड मधील १८२ महाविद्यालयातील ५०० पेक्षा अधिक विध्यार्थी सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. विलास उगले यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा सदस्य प्रसेनजित फडणवीस, व्यवस्थापन परिषद सदस्य बागेश्री मंठाळकर आणि संचालक, राष्ट्रीय सेवा योजना डॉ. सदानंद भोसले उपस्थित होते. या सोहळ्याचे अध्यक्षस्थानी श्री शिवाजी मराठा सोसायटी सहसचिव विकास गोगावले यांच्यासह खजिनदार जगदीश जेधे, नियामक मंडळ अध्यक्ष सत्येंद्र कांचन, नियामक मंडळ सदस्य कमल व्यवहारे, जेधे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. दिपाली पाटील यावेळी उपस्थित होते.
पथनाट्य स्पर्धेतून अवयवदान, व्यसनमुक्ती, योग साधनेचे महत्त्व, लोकसंख्यावाढ या सामाजिक प्रश्नांवर विद्यार्थ्यांनी प्रकाश टाकला. काव्यवाचन, निबंध स्पर्धा, वक्तृत्व, भित्तीचित्र, पोवाडा गायन, पथनाटय या स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी भाग घेतला.
प्राचार्य डॉ. दिपाली पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा समन्वयक डॉ. अमित गोगावले यांनी केले. डॉ. शिवाजी पाचारणे यांनी आभार मानले.

