पुणे: प्रादेशिक सिनेमांची अनोखी सफर घडवणाऱ्या ‘लाईमलाईट प्रादेशिक’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते येत्या शनिवारी (ता. २७) सायंकाळी ५ वाजता लजपतराय भवन संकुल, विद्यार्थी सहायक समिती, सेनापती बापट रस्ता पुणे येथे होणार आहे. रुद्र पब्लिशिंग हाऊस प्रकाशित अच्युत गोडबोले व सतीश कुलकर्णी लिखित या पुस्तकामध्ये प्रादेशिक भाषांची जादू, अविस्मरणीय चित्रपटांची गाथा उलगडण्यात आली आहे. रुद्र पब्लिशिंग हाऊस आणि पुस्तकविश्व या संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, असे संयोजक नवनाथ जगताप यांनी कळवले आहे.
या पुस्तकाला प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे, ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते, सोनाली कुलकर्णी यांनी या पुस्तकाविषयी भरभरून अभिप्राय दिला आहे. मराठीसह बंगाली, कन्नड, तेलगू, गुजराती, मैथिली अशा प्रादेशिक भाषांमधील सिनेमांचा रसास्वाद अतिशय रंजकपणे मांडला आहे. चित्रपटांची आवड असलेल्या रसिक-प्रेक्षकांना उत्तम, रंजक प्रादेशिक चित्रपटांची कथानके आणि दिग्दर्शनातील कंगोरे, अभिनयाची वैशिष्ट्ये याची ‘क्लासिक मुशाफिरी’ घडवणारे हे पुस्तक आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असणार आहे.

