पुणे, दि. १७ सप्टेंबर, २०२५- नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये महावितरणची १०५७ प्रकरणे निकाली काढण्यात आली. या प्रकरणांतून महावितरणची २ कोटी १८ लाखांची वसुली सुद्धा झाली. यामध्ये दाखल पूर्व व प्रलंबित अशा दोन्ही प्रकरणांचा समावेश आहे.
नियममित वसुलीबरोबरच कायमस्वरुपी बंद असलेल्या व थकबाकीमुळे बंद केलेल्या जवळपास ग्राहकांच्या वीजबिल वसुलीसाठी महावितरण कायम आग्रही असते. त्यासाठी वेळोवेळी वसुली मोहिमा राबविल्या जातात. त्यातूनही ज्या प्रकरणांत वसुली होत नाही अशी प्रकरणे महावितरणतर्फे लोकअदालतीमध्ये ठेवली जातात. महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे परिमंडलातील गणेशखिंड, रास्तापेठ व पुणे ग्रामीण या तीन मंडलांमध्ये थकबाकीमुळे बंद असलेल्या ५१३१७ वीज ग्राहकांना १३ सप्टेंबर रोजी पुणे येथे होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीपुढे ठेवण्यात आले होते. सर्व प्रकरणातील वादींना तशा नोटीसाही बजावण्यात आल्या होत्या. तसेच वीजचोरीची ८३ प्रकरणे देखील लोकअदालतीपुढे ठेवण्यात आली.
५१३१७ प्रकरणांपैकी १०५३ प्रकरणांमध्ये २ कोटी १४ लाख ८९ हजार ३०८ रुपयांचा भरणा झाला. यात सर्वाधिक पुणे ग्रामीण मंडलातील १० ग्राहकांकडून १ कोटी ३ लाख ४१ हजारांचा तर त्यापाठोपाठ रास्तापेठ मंडल ९६ लाख ९७ हजार ८१८ व गणेशखिंड मंडलातून १७ लाख ८४ हजार ९३० रुपये वसूल झाले. तर वीजचोरीच्या ८३ पैकी ४ गुन्ह्यांमध्ये तडजोड झाली. त्यातून ४ लाख ८ हजार ४४० रुपयांची रक्कम वसूल झाली. या लोकअदालतीच्या यशस्वीतेसाठी प्रभारी विधी सल्लाकार दिनकर तिडके, कनिष्ठ विधी अधिकारी नितल हासे, अंजली चौगुले व इम्रान शेख यांनी परिश्रम घेतले.

