आधार कार्ड व रेशन कार्ड घेऊन या, (आभा कार्ड) तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनांचे कार्ड काढून न्या .

पुणे- केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांचे मार्गदर्शनाखाली “स्वस्थ नारी सशक्त परिवार” अभियान अंतर्गत पुणे महापालिकेतर्फे किशोरवयीन मुली, गरोदर माता, स्तनदा माता व महिलांच्या आरोग्य विषयक तज्ञ आरोग्य तपासण्यांसाठी शिबिराचे आयोजन येथे करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन पुणे महापालिकेच्या कमला नेहरू हॉस्पिटल येथे केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगीमहापालिका आयुक्त नवल किशोर राम,माजी सभागृहनेते गणेश बिडकर ,अतिरिक्त महापालिका आयुक्त एस.जे. प्रदीप चंद्रन,ओमप्रकाश दिवटे,आरोग्य प्रमुख नीना बोराडे ,उपसंचालक, आरोग्य भगवान पवार, सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. मनिषा नाईक,डॉ. वैशाली जाधव ,उपआरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बळीवंत,कमला नेहरू रुग्णालयाचे डॉ. प्रशांत बोठे, माजी नगरसेवक विशाल धनवडे पल्लवी जावळे तसेच राज्य शासन व पुणे महानगरपालिकेचे इतर अधिकारी, कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांचे मार्गदर्शनाखाली “स्वस्थ नारी सशक्त परिवार” अभियान दि. १७/०९/२०२५ ते दि. ०२/१०/२०२५ या कालावधीत सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत राबविण्यात येणार आहे.
या अभियानाअंतर्गत पुणे महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालये, युपीएचसी, आयुष्यमान आरोग्य मंदिर, हिंदूहृदयसम्राट बाळसाहेब ठाकरे आपला दवाखाना अशा स्तरावर जनजागृती व तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. सदर अभियानात प्रामुख्याने किशोरवयीन मुली, गरोदर माता, स्तनदा माता व महिलांच्या आरोग्य विषयक सर्व तपासण्या करून रुग्णांवर आवश्यक पुढील उपचार करण्यात येणार आहेत.या अभियानात सर्व प्रसूतिगृहे पुणे मनपा या ठिकाणी महाआरोग्य शिबीराचे नियोजन करण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, कान-नाक-घसा तज्ञ, दंत चिकित्सक, त्वचारोग तज्ञ,मानसोपचार तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, फिजीशीयन, फिजीओथेरीपिस्ट इत्यादी तज्ञांचा समावेश करून महिलांना आरोग्य विषयक तज्ञ सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

तज्ञ डॉक्टर शिबिरामध्ये खालीलप्रमाणे सेवा देण्यात येणार आहेत
त्यामध्ये,महिलांची एनसीडी तपासणीः उच्च रक्तदाब, मधुमेह, तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, आणि गर्भाशयाच्या मुखाची कर्करोग तपासणी.असुरक्षित महिलांसाठी क्षयरोग तपासणी.
किशोरवयीन मुली आणि महिलांसाठी अशक्तपणाची तपासणी व समुपदेशन सेवा तसेच मासिक पाळी व स्वच्छता आणि पोषण यावर जागरूकता सत्र,
गर्भवती महिलांसाठी प्रसुतीपूर्व काळजी (एएनसी) तपासणी ज्यामध्ये हिमोग्लोबिन पातळीची चाचणी, गर्भधारणेदरम्यान पोषण आणि काळजी यावर समुपदेशन आणि माता आणि बाल संरक्षण (एमसीपी) कार्डचे वितरण.
बालकांना लसीकरण सेवा प्रदान करण्यात येणार आहे.
पोषण समुपदेशन आणि कल्याणसत्र, रक्तदान मोहीम, पीएमजेएवाय अंतर्गत नोदणी/ आयुष्मान वय वंदना कार्ड चे वितरण, निक्षयमित्र स्वयंसेवकांची नोंदणी.
तसेच सर्व युपीएचसी, आयुष्मान आरोग्य मंदिर व हिंदूहृदयसम्राट बाळसाहेब ठाकरे आपला दवाखाना यांच्यामार्फत प्रत्येक आठवड्याला २ शिबिरे घेण्यात येणार असून सदर आरोग्य संस्थेमध्ये येणाऱ्या नागरिक व रुग्णांची प्राथमिक आरोग्य तपासणी करून आवश्यकता असल्यास त्यांना पुढील उपचारासाठी नजीकच्या प्रसुतीगृहाकडे संदर्भित करण्यात येणार आहे.
सोबत येताना नागरिकांनी आधार कार्ड व रेशन कार्ड घेऊन यावे जेणेकरून नागरिकांना (आभा कार्ड) तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनांचे कार्ड काढून देण्यात येतील.
चतुश्रृंगी देवी मंदिर, तांबडी जोगेश्वरी मंदिर व भवानी माता मंदिर इत्यादी ठिकाणी नवरात्र काळात महिलांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यासाठी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत विशेष शिबीर आयोजित करण्यात येणार आहे.
या शिबिरा करिता आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका याच्या कडून मनुष्यबळ, औषधे साधन सामग्री याची पूर्व तयारी करण्यात आली आहे,
शिबिराचे काटेकोर नियोजन करण्याबाबत परिमंडळ व क्षेत्रिय वैद्यकीय अधिकारी यांना निर्देश देण्यात आले आहे.

