मुंबई-शिवाजी पार्क परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. अज्ञात व्यक्तीने मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर शिवसैनिकांनी पुतळ्याची साफसफाई केली आहे. पोलिस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने आरोपीचा शोध घेत आहेत. सध्या परिसरात खबरदारी म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
वातावरण दूषित करण्यासाठी कोणीतरी हे कृत्य केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. या घटनेमागे एखादा समाजकंटक आहे की माथेफिरू आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी शिवसैनिकांनी केली आहे.
स्थानिक आमदार महेश सावंत यांनी सांगितले की, आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आम्हाला या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक शिवसैनिक घटनास्थळी दाखल झाले. त्याच वेळी पोलिसही दाखल झाले होते. पोलिसांच्या माहितीनुसार सकाळी 6.10 वाजेपर्यंत सर्व काही व्यवस्थित असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून आले आहे. याचा अर्थ ही घटना सकाळी 6.10 वाजल्यानंतर झाली असावी अशी माहिती त्यांनी दिली. पोलिसांनी दुपारपर्यंत आरोपीची माहिती समोर येणार असल्याचे सांगण्यात आले.
कुणीतरी रंग फेकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी केला आहे. या समाजकंटकी किंवा भेकडांवर कुठले संस्कार नक्कीच झालेले नसतील. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. पण राज्यातील पोलिस यंत्रणा आणि सरकार काय करतंय? असा संतप्त सवाल अनिल देसाई यांनी उपस्थित केला आहे. निषेध करण्याच्या पलिकडची ही गोष्ट आहे. सरकारचे अपयश प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसतंय. उद्धव ठाकरेंना या प्रकाराची कल्पना दिलेली आहे. आम्ही आमच्या पातळीवर जे करायचे आहे, ते करतोय, असे अनिल देसाई म्हणाले.
अशा समाजकंटकांना आजच्या प्रकाराचे प्रत्युत्तर मिळेल, असा इशाराही अनिल देसाई यांनी दिला. शिवसैनिकांनी पुतळा परिसर स्वच्छ केला आहे. शिवाजी पार्कसारख्या ठिकाणी असा प्रकार घडतोय, यावरून सध्या मुंबई सुरक्षित नाहीये, असे दिसतंय. सरकार भलत्यासलत्या कार्यक्रमांमध्ये मश्गुल आहे. आजची घटना म्हणजे सरकारचे अपयश असून, ते महाराष्ट्रापुढे आले आहे, अशी टीकाही अनिल देसाई यांनी सरकारवर केली.
बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांना शिवसैनिकांमध्ये एक आदराचे स्थान होते. शिवसैनिक त्यांना ‘माँसाहेब’ असे संबोधत असत आणि त्यांचा प्रचंड आदर करत. 1995 साली मीनाताई ठाकरे यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर, शिवसैनिकांनी त्यांच्या स्मृती कायम जपण्यासाठी मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कच्या प्रवेशद्वाराजवळ त्यांचा अर्धपुतळा उभारला. तेव्हापासून आजपर्यंत हा पुतळा त्याच ठिकाणी उभा आहे,.

