पुणे : गुरुवार पेठेतील तब्बल 40 वर्षे जुनी सराफी पेढी फोडून चोरट्यांनी तब्बल 67 लाख 60 हजार रुपयांचा ऐवज आणि रोकड लंपास केली. तीन पोत्यांमध्ये भरून जवळपास 70 किलो चांदी तसेच पाच लाख रुपयांची रोकड घेऊन चोर पळाल्याने व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परमार यांचे माणिक ज्वेलर्स नावाचे दुकान 381 गुरुवार पेठ येथे असून हे दुकान लाकडी दरवाज्याचे आहे. शेजारील ज्वेलर्स दुकानांप्रमाणे या दुकानात सुरक्षारक्षक नव्हता. त्याचा फायदा घेत सोमवारी मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास चोरट्यांनी कटावणीच्या साह्याने दुकानाचे दरवाजे तोडून आत प्रवेश केला. समोरच्या कपाटात ठेवलेले चांदीचे दागिने त्यांच्या नजरेस पडले. त्यांनी पैंजण, बेसलेट, चैन, नाणी तसेच देवांच्या चांदीच्या मूर्ती या सर्व वस्तू सिमेंटच्या पोत्यांमध्ये भरल्या. यासोबतच दुकानातील पाच लाख रुपये रोकडही लंपास केली.
सुरुवातीला तीन पोती भरल्यानंतर ते जड झाल्याने चोरट्यांनी खांद्यावर उचलून ते वाहून नेले. चोरीची ही घटना घडत असताना चोर जवळपास अर्धा तास दुकानात थांबले होते. सकाळी साडेसहा वाजता दुकानाजवळ राहणाऱ्या कामगारांना दरवाजा फोडलेला दिसून आला. त्यांनी तत्काळ मालकांना कळवले. मालकांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. त्यानंतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
चोरांनी एकूण 40 लाख रुपयांचे 45 किलो वजनाचे पैंजण, 13 लाख 50 हजार रुपयांचे 15 किलो वजनाचे कडे, चैन, बेसलेट, मासोळी आदी दागिने, नऊ लाखांचे 10 किलो वजनाचे गणपती, लक्ष्मी, स्वामी समर्थ, गजानन महाराज यांच्या मूर्ती, पाच लाख रुपये रोकड तसेच 10 हजारांचा डीव्हीआर असा ऐवज चोरीस नेला.
या प्रकरणी अज्ञात तीन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोर चांदीची पोती वाहून नेत असल्याचे दिसून आले आहे. ते पायी दुकानात आले होते, असेही स्पष्ट झाले आहे. या चोरीनंतर खडक पोलिसांची दोन पथके व गुन्हे शाखेची दोन पथके तपासासाठी रवाना झाली असून आरोपींचा शोध सुरू आहे.

