पुणे : शहरातील नागरिकांची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे महापालिका आणि पीएमपीएमएल प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. विशेषत: आयटी हब म्हणून ओळख असणाऱ्या हिंजवडी, खराडी आणि मगरपट्टा या भागात मोठ्या प्रमाणावर नोकरदार वर्ग कामासाठी प्रवास करत असल्याने त्या परिसरातील नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी पीएमपीएमएल प्रशासनाने डबलडेकर इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
या संदर्भात आज कात्रज आगार ते हिंजवडी दरम्यान डबलडेकर बसची यशस्वी चाचणी घेण्यात आली. या वेळी पीएमपीएमएलचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, “नागरिकांना वाहतुकीच्या कोंडीतून मुक्तता मिळावी, सार्वजनिक वाहतुकीचा दर्जा उंचावावा आणि प्रवाशांना आरामदायी प्रवासाची सुविधा मिळावी, यासाठी आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे.”
चेन्नई येथील ‘स्विच’ कंपनीकडून या डबलडेकर इलेक्ट्रिक बस मागवण्यात आली आहे. एका बसची किंमत तब्बल दोन कोटी रुपये असून यात एकूण ८५ प्रवाशांची आसनव्यवस्था आहे. खालच्या मजल्यावर ४५ प्रवासी तर वरच्या मजल्यावर ४० प्रवासी बसू शकतील. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सुविधाही या बसमध्ये देण्यात आली आहे. त्यामुळे बसमधील प्रत्येक हालचालीवर नियंत्रण ठेवणे प्रशासनाला सोयीचे ठरणार आहे.
देवरे यांनी पुढे सांगितले की, “आम्ही हिंजवडीसह आणखी काही महत्त्वाच्या मार्गांवर १० ते १५ दिवस या बसची चाचणी घेणार आहोत. चाचणी यशस्वी ठरल्यानंतर सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून दिवाळीपर्यंत पुणेकर नागरिकांसाठी डबलडेकर बस सेवा सुरू करण्याचा आमचा मानस आहे.”
डबलडेकर बस सेवा सुरू झाल्यास पुण्यात प्रथमच अशा प्रकारचा अनुभव नागरिकांना घेता येणार आहे. विशेषत: आयटी हब परिसरात काम करणाऱ्या हजारो कर्मचारीवर्गासाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा आहे. या उपक्रमामुळे पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासाचा त्रास कमी होईल आणि वाहतूक कोंडीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवता येईल.
या चाचणीस उपस्थित असलेल्या प्रवाशांनीही ही बस सोयीस्कर आणि आधुनिक वाटत असल्याचे मत व्यक्त केले. पर्यावरणपूरक प्रवास, आरामदायी आसनव्यवस्था आणि अधिक क्षमतेचा फायदा पुणेकरांना मिळणार असल्याने नागरिकांमध्ये या नव्या उपक्रमाबद्दल उत्सुकता वाढली आहे. दिवाळीपर्यंत ही बस सेवा नियमित सुरू झाल्यास पुणेकरांना हा एक नवा अनुभव लाभणार आहे.

