पुणे- शहरातील वाघोली परिसरात एका इमारतीत लिफ्ट कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या लिफ्टमध्ये तीन महिला, दोन पुरुष आणि एक लहान मूल असे सहा जण होते. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नसून, सर्वजण सुरक्षित आहेत. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, पुण्यातील वाघोली परिसरात ही दुर्घटना घडली. एका इमारतीतील लिफ्टमधून सहा जण खाली येत होते. मात्र, अचानक लिफ्टचा वेग वाढून ती अचानक खाली कोसळली. लिफ्ट अचानक वेगाने खाली येऊन थेट जमिनीवर आदळल्याची संपूर्ण दृश्ये इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. फुटेजमध्ये लिफ्ट अचानक वेग पकडून क्षणात कोसळल्याचे दिसत असून, लिफ्टमधील प्रवासी घाबरलेले दिसत आहेत. मात्र, लिफ्ट आदळल्यानंतरही सर्व जण सुखरूप बाहेर पडले. त्यामुळे या घटनेत चमत्कारिकरीत्या जीवितहानी टळलेली असल्याचे मानले जात आहे.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ प्रवासी आणि परिसरातील रहिवासी मोठ्या भीतीत सापडले. मुलासह सहा रहिवाशांचे प्राण थोडक्यात वाचल्याने सुखद वाटले असले, तरी या घटनेनंतर इमारतीतील लिफ्टच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.घटनेनंतर इमारतीतील रहिवाशांनी प्रशासनाला लिफ्टची नियमित तपासणी करण्याची मागणी केली आहे. लिफ्टमधील सुटे भाग, देखभाल व तांत्रिक तपासणी याकडे योग्य वेळी लक्ष दिले नाही, तर अशा घटना गंभीर स्वरूप धारण करू शकतात, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकारामुळे लिफ्ट सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, प्रशासन व गृहनिर्माण सोसायट्यांनी तत्काळ दक्षता घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

