- केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे आयोजन
- पावसामुळे ड्रोन लाईट शो एक दिवस पुढे
पुणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आयोजित केलेला ड्रोन लाईट शो पावसाच्या शक्यतेने एक दिवस पुढे ढकलण्यात आला असून मोदी यांच्या वाढदिवस दिनी म्हणजे १७ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता हा ड्रोन लाईट शो स.प. महाविद्यालयाच्या मैदानात होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या औचित्याने केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पैकी महाराष्ट्रात प्रथमच होणारा ड्रोन लाईट शो आणि अवधूत गुप्ते यांची लाईव्ह इन कॉन्सर्ट ही १६ सप्टेंबर रोजी नियोजित होती. मात्र मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे आणि पावसाच्या संभाव्य शक्यतेमुळे दोन्ही कार्यक्रम मोदींच्या वाढदिवस दिनीच होणार आहेत.
याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस दिनी अवधूत गुप्ते यांची लाईव्ह कॉन्सर्ट सायंकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत तर ड्रोन लाईट शो हा रात्री आठ ते नऊ या वेळेत होत आहे. अयोध्या आणि वाराणसीनंतर महाराष्ट्रात हा प्रथमच भव्य-दिव्य ड्रोन शो होणार असून यात एकाच वेळी एक हजार ड्रोनच्या माध्यमातून पुणेकरांना तंत्रज्ञानाची नवी अनुभूती मिळणार आहे. यात महाराष्ट्राच्या मानबिंदूंसह पंतप्रधान मोदींच्या विकसित भारताच्या संकल्पाचे प्रतिबिंब अनुभवयास मिळणार आहे.
पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यवस्था करण्यात आली असून नागरिकांची गैरसोय होऊ नये, याची पूर्ण काळजी घेतली गेली आहे. स.प. महाविद्यालयाच्या मैदानात नागरिकांना हा ड्रोन शो पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

