पुणे- शहर व परिसरात रविवारी रात्री पासून वीजांचा कडकडाटासह जाेरदार पाऊस पडत आहे. साेमवारी देखील सकाळपासूनच पाऊस सुरु झाला. भारतीय हवामान विभागाने पुणे परिसरात ऑरेंज अर्लट दिला आहे. परिणामी साेमवारी मध्यरात्री १२ ते सकाळी आठ वाजेदरम्यान विमान वाहतूक लक्षणीयरित्या विस्कळीत झाली. पुण्यात झालेल्या मुसळधार पावसाने १४ विमानांची उड्डाणे वळविण्यात आली, तर ३ विमानांना पुन्हा माघारी बोलावण्यात आले आहे, अशी माहिती पुणे विमानतळ प्राधिकरणाने दिली आहे.
पावसाची तीव्रता कमी झाल्यावर विमान वाहतूक पूर्ववत सुरु झाली आहे. भारतीय हवाई दलाने (आयएएफ) लष्कराच्या ब्लाॅक वेळेत पुणे विमान प्राधिकरण यांना उड्डाणांना परवानगी दिल्याने विमान वाहतूक सुरळित हाेऊ शकली आहे. विमान कंपन्या, सीआयएसएफ व एअरपाेर्ट अथॉरिटी इंडिया यांच्या वतीने प्रवाशांना अखंड विमान वाहतूक सेवा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. विमान उड्डाणांचे वेळापत्रक काेलमडल्याने विमानतळावर प्रवाशांना अधिक काळ बसावे लागले त्यामुळे त्यांच्या अतिरिक्त बसण्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी, चहा, काॅफी व जेवणाची देखल व्यवस्था करण्यात आली.
या विमानांची वाहतूक वळवली
साेमवारी मध्यरात्री पावणे एक वाजताचे बंगळुरू – पुणे – बंगळुरू विमान खराब हवामानामुळे हैद्राबादला वळविण्यात आले. रात्री सव्वा दाेन ते तीन वाजण्याचे दरम्यानचे हैद्राबाद -पुणे- चंदीगड विमान सुरतला वळविण्यात आले. बगळुरू-पुणे-बंगळुरू हे रात्री पावणेतीन वाजताचे विमान हैद्राबादला वळवले गेले. तर, कलकत्ता-पुणे-कोईम्बतूर हे पहाटे तीन वाजून २० मिनिटांचे विमान हैद्राबादला वळविण्यात आले. साेमवारी सकाळी साडेसहा वाजता ते पुण्यात परत उतरविण्यात आले.
चेन्नई-पुणे- चेन्नई हे विमान पहाटे तीन वाजून ५५ मिनिटांनी मुंबईला विळविण्यात आले. तर, थायलंड येथून पुण्यात येणारे विमान देखील पहाटे याचवेळी मुंबईला वळवले गेले. बँकाॅक-पुणे-गाेवा हे विमान गाेव्याला पहाटे पाच वाजून २५ मिनिटांनी वळून पुन्हा साेमवारी सकाळी सात वाजून ४१ मिनिटांनी पुणेला परत उतरवले गेले. हैदराबाद -पुणे हे विमान देखील खराब हवामानामुळे पुन्हा हैदराबादच्या दिशेने वळविण्यात आले. भाेपाळ-पुणे-इंदूर हे विमान आणि दिल्ली-पुणे-दिल्ली विमान देखील हैदराबादला वळविण्यात आले. दिल्लीचे विमान पुन्हा सकाळी साडेनऊ वाजता पुणे विमानतळावर उतरवले गेले. नागपूर-पुणे- कोलकाता विमान हे देखील प्रभावित झाले व ते अहमदाबादला वळविण्यात आले. चेन्नई-पुणे- वडाेदरा हे विमान देखील हैद्राबादला वळवले गेले. बंगळुरू-पुणे-बंगळुरू पुणे विमान देखील हैद्राबादला नेण्यात आले. दिल्ली-पुणे-दिल्ली हे विमान अहमदाबादला वळवले गेले. जयपूर-पुणे-गाेवा विमान देखील हैद्राबादला खराब हवामानाने वळविण्यात आले.

