पुणे-‘राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखडा’ (एनआयआरएफ) रँकिंग मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) फर्ग्युसनने राज्यात ‘महाविद्यालय गटात’ अव्वल क्रमांक प्राप्त केला असून, त्या निमित्ताने आज आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
डीईएसचे अध्यक्ष प्रमोद रावत म्हणाले, “सन 2016 पासून फर्ग्युसन राज्यात अव्वल स्थानी आहे. यावर्षी अव्वल स्थान कायम राखताना गेल्या वर्षीच्या 56.77 टक्के गुणांच्या तुलनेत 58.35 टक्के अशी वाढ झाली आहे.”
रावत पुढे म्हणाले, ” राष्ट्रीय स्तरावरील महाविद्यालय गटात फर्ग्युसनचा या वर्षी 57 वा क्रमांक आहे. शिक्षण व अध्यापन, संशोधन व व्यावसायिक प्रथा, पदवीधरांचे परिणाम, संपर्क आणि पोहोच आणि प्रतिष्ठा आणि धारणा या निकषांच्या आधारे हे रँकिंग ठरते. आगामी काळात रँकिंग सुधारण्यासाठी गुणवत्तापूर्ण संशोधन व त्याचे प्रकाशन, विज्ञान शाखेबरोबर कला शाखेच्या प्लेसमेंटमध्ये वाढ, पदवीधरांचे परिणाम या विषयांवर अधिक काम करणार आहोत. शासनाने प्राध्यापकांची कायमस्वरूपी पदे भरण्यास मान्यता दिल्यास रँकिंग सुधारण्यास मदत होऊ शकेल.”
‘फर्ग्युसनमध्ये आनंदोत्सव’
हे यश साजरे करण्यासाठी आज फर्ग्युसन महाविद्यालयात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या सर्व विभागांमध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. महाविद्यालयाच्या परिसरात शोभायात्रा काढण्यात आली. विद्यार्थी आणि प्राध्यापक पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते.रमणबाग ढोल-ताशा पथकाने उत्साह वाढविला. डीईएसचे अध्यक्ष प्रमोद रावत, उपाध्यक्ष ॲड. अशोक पलांडे, संचालक मिलिंद कांबळे, प्राचार्य डॉ. श्याम मुडे, उपप्राचार्या प्रा. स्वाती जोगळेकर, डॉ. विनय आचार्य, प्रा. प्राजक्ता प्रधान यांची प्रमुख उपस्थिती होती.

