पाकिस्तानला हरवल्यामुळे 26 महिलांचे कुंकू परत आले का?:संजय राऊत संतापले
मुंबई-भारत – पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना हा फिक्सिंग मॅच असून यातून दीड लाख कोटी रुपयांचा जुगार खेळाला गेला असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यातील किमान 25000 कोटी रुपये पाकिस्तानत गेले आहेत. हा पैसा आता पाकिस्तान भारताविरुद्ध वापरणार आहे. हे नरेंद्र मोदी, अमित शहा, जय शहा आणि भारतीय क्रिकेट बोर्डाला कळत नाही का? असा प्रश्न देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला.
पाकिस्तान सोबत विजय किंवा पराजय हा मुद्दाच नाही. कोणी जर असे म्हणत असेल तर तो मूर्खपणा आहे. पाकिस्तान सोबत क्रिकेटची मॅच न खेळण्याचा मुद्दा आहे. पाकिस्तानला हरवल्यामुळे पहलगाम मधील 26 महिलांचे कुंकू परत आले का? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. पाकिस्तानला घरात घुसून मारण्याची संधी असताना देखील भारताने माघार घेतली. बलुचिस्तान पर्यंत जाणार होते, त्यांचे कंबरडे मोडणार होते ना? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कालच्या मॅचवर दीड लाख कोटी रुपयांचा जुगार खेळला गेला. यातील काही पैसे पाकिस्तानला देखील मिळाले असतील. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला किमान 1000 कोटी रुपये कालच्या मॅचने मिळाले असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला.
पाकिस्तानला जागतिक बँकेकडून कर्ज मिळू नये, आयएमएफ, आशिया डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज मिळू नये, म्हणून आपण प्रयत्न करत होतात. कारण हा पैसा पाकिस्तानला मिळाला असता तर तो पैसा पाक दहशतवादामध्ये गुंतवणूक करेल. ही भारताची भूमिका होती. ही मोदींची भूमिका होती. तर दुसरीकडे काल भारताने पाकिस्तान क्रिकेट बोर्डला 1000 कोटी रुपये मिळवून दिले. हे पैसे कुठे जाणार आहेत? असा प्रश्नही त्यांनी विचारला. पाकिस्तानला आर्थिक दृष्ट लढण्यासाठी आणि भारतीय महिलांचे कुंकू पुसण्यासाठी सरकार मदत करत आहे. अशा मॅचवर आम्ही थुंकतो. 26 महिलांचे कुंकू उजाड करून त्यांच्याशी तुम्ही क्रिकेट खेळतात? तुम्हाला लाजा वाटत नाही का? असा संतप्त सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीगाठींना वेग आला आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांत त्यांनी तब्बल चार वेळा चर्चा केल्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये युती जवळपास निश्चित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीचा महत्त्वाचा घटक असल्याने ही युती शक्य होईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी शरद पवारांच्या भूमिकेविषयी मोठे विधान केले आहे. “राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास पवारांना काहीच अडचण नाही. महाराष्ट्राच्या भावना त्यांना ठाऊक आहेत,” असे राऊत यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पवार अडथळा ठरणार नाहीत, उलट त्यांनी अशा युतीला अनुकूलतेची भूमिका घेतल्याचे संकेत राऊत यांनी दिले.
दरम्यान, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी काही दिवसांपूर्वीच या विषयावर काँग्रेस हायकमांड निर्णय घेईल, असे सांगितले होते. यावर बोलताना राऊत म्हणाले की, “महाराष्ट्रात काय चाललं आहे याची माहिती आम्ही काँग्रेसच्या नेतृत्वाला देत असतो. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह राज्यातील काँग्रेस नेत्यांनाही याची कल्पना असते.” त्यामुळे शिवसेना-मनसे युतीवर काँग्रेस किंवा राष्ट्रवादी आडकाठी करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

