पुणे : जनरल प्रॅक्टिशनर्स बहुतेक वेळा मल्टीस्पेशालिस्ट असतात. त्यांचे काम सगळ्यात जास्त अवघड असते. आयुर्वेदापासून सुरुवात करत ते अॅलोपथी च्या पुढे आज आले आहेत. अॅलोपथी आणि आयुर्वेद अशी एकात्मक औषधोपचार प्रणाली आपल्याला हवी आहे. जनरल प्रॅक्टिशनर्स हे शक्य करतील, असे मत पुणे महापालिकेच्या आरोग्यप्रमुख डाॅ. नीना बोराडे यांनी व्यक्त केले.
जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन व जनरल प्रॅक्टिशनर्स प्रियदर्शिनी यांच्या वतीने महिला परिषद व लेडी जीपी ऑफ द इयर पुरस्कार समारंभा चे आयोजन टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात करण्यात आले होते. डॉ. रूपा अगरवाल यांना लेडी जीपी ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून पहिल्या महिला लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी, जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुनील भुजबळ, असोसिएशनच्या सचिव डॉ. भाग्यश्री मुनोत-मेहता, प्रियदर्शिनीच्या अध्यक्षा डॉ. मनीषा खेडकर, सह-अध्यक्षा डॉ. रश्मी खैरनार व डॉ. अमृता महाजन, सचिव डॉ. सीमा पाटील व डॉ. हर्षला बाबर तसेच संयुक्त सचिव डॉ. सयानी गांधी व डॉ. तेजश्री गुरव उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. अमोल लुंकड यांनी पीसीओएस विषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर डॉ. मधुसूदन असावा यांनी हृदय व महिला आरोग्य या विषयावर माहिती दिली. सीए रोहन गुप्ता यांनी आर्थिक साक्षरता व महिला यावर मार्गदर्शन केले. डॉ. अमोल लुंकड यांनी शेवटी वंध्यत्वावरील प्रकरणाधारित चर्चा केली.
डॉ. नीना बोराडे म्हणाल्या की, वैद्यकीय क्षेत्रात महिला डॉक्टरांची वाढ फक्त संख्यात्मक नाही तर गुणात्मकही आहे. महिलांचे योगदान मोठे असून संवेदनशीलतेची जोड मिळाल्यास वैद्यकीय सेवा अधिक सुंदर होते. महिला डॉक्टरांमध्ये बाईपणाबरोबर आईपण देखील महत्त्वाचा गुण आहे, आईपण हा विचार, वृत्ती आणि सेवाभाव आहे.
आज काही डॉक्टर १२ तासांपेक्षा जास्त काम करतात, ज्यामुळे कामाचे तास वाढतात आणि तणावही येतो. त्यामुळे स्वतःची आरोग्य काळजी घेणे आवश्यक आहे. मेंटल हेल्थसाठी डॉक्टरांनी एकत्र येणे गरजेचे आहे. समाजाचे आरोग्य अबाधित ठेवणाऱ्या डॉक्टरांनी स्वतःची देखील काळजी घ्यावी.
डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी म्हणाल्या की, ओपन सर्जरीपासून लेप्रोस्कोपीकडे जाणे रुग्णांसाठी मोठा बदल ठरला. आताच्या काळात रोबोटिक शस्त्रक्रियेच्या सहाय्याने अत्यंत अचूकता आणि कौशल्यामुळे क्लिष्ट लेप्रोस्कोपी शस्त्रक्रिया शक्य झाल्या आहेत. रोबोटिक उपकरणांवर खर्च येतो कारण प्रत्येक उपकरणाची ठरलेली जीवनमर्यादा असते. काही खर्च रुग्णाला पास करावा लागतो, पण काळानुसार हा खर्च कमी होईल. सध्या या तंत्रज्ञानामुळे आधी अशक्य वाटणाऱ्या क्लिष्ट शस्त्रक्रिया आता शक्य झाल्या आहेत.
डॉ. सुनील भुजबळ, डॉ. मनीषा खेडकर यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. भाग्यश्री मुनोत-मेहता व डॉ. राजेश दोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. डॉ.राजेश दोषी यांनी आभार मानले.

