पुणे :महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांच्या संयुक्त विद्यमाने २४ वे गांधी दर्शन शिबिर गांधी भवन, कोथरूड येथे यशस्वीपणे पार पडले. १४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चाललेल्या या शिबिरात विविध विषयांवर विचारप्रवर्तक मार्गदर्शन झाले.मुंबई विद्यापीठ राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. दीपक पवार यांनी ‘भारतातील भाषेचा प्रश्न’ या विषयावर सखोल विचार मांडले. ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते विजय दिवाण यांनी ‘गांधी, विनोबा आणि सद्य-परिस्थिती’ या विषयावर प्रेरणादायी भाष्य केले. इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांनी ‘शिवरायांची अष्टक्रांती’ या विषयावर उपस्थितांना ऐतिहासिक दृष्टिकोन दिला.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त सचिव अन्वर राजन यांनी प्रास्ताविक केले. शिबिराचे अध्यक्षस्थान डॉ. कुमार सप्तर्षी (अध्यक्ष, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी) यांनी भूषविले. या प्रसंगी डॉ. मच्छिंद्रनाथ गोर्डे,डॉ.प्रकाश परब,डॉ.प्रवीण सप्तर्षी,अॅड. स्वप्नील तोंडे,अप्पा अनारसे,तेजस भालेराव,राजेश तोंडे,संदीप बर्वे यांची विशेष उपस्थिती होती.शिबिरात विद्यार्थी, संशोधक, सर्वोदयी कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
विजय दिवाण म्हणाले,’ विनोबा भावे यांच्यावर सरकारी संत असल्याचे आरोप झाले. परंतु, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कावा पुरेपूर ओळखल्याने त्यांनी संघासोबत जाण्याची भूमिका स्वीकारली नाही. आणीबाणीत ज्यांनी संघाला मोठे केले,त्यांनी ज्या चुका केल्या,त्या विनोबा भावे आणि सर्वोदयी कार्यकर्त्यांनी केल्या नाहीत. विनोबांची दूरदृष्टि आज मान्य करायला हरकत नाही. काँग्रेसला पाठिंबा देऊनच भाजपचा पराभव आगामी काळात होईल.
‘आजची परिस्थिती उत्तर पेशवाईसारखी आहे.तेव्हाही धर्मसत्ता,अर्थसत्ता,राज्यसत्ता एकत्र होती आणि ती जाचक झाली होती.राज्यसत्ता,अर्थसत्ता यांचा पराभव करता येईल.मात्र, संघाचा आणि धर्मसत्तेचा पराभव करायला परिश्रम घ्यावे लागतील.कारण ती एकाच जातीच्या हातात आहे.धर्म न नाकारता, धर्मात सुधारणा करीत पुढे जावे लागणार आहे. फॅसिस्ट राजसत्ता, अर्थसत्ता उलथवून टाकता येईल, मात्र, धर्मसत्ता उलथवून टाकणे अवघड आहे. त्यामुळे खऱ्या द्वेषरहित,मानवतावादी धर्माच्या मार्गाने जाण्याचा आग्रह धरला पाहिजे. स्वामी विवेकानंद, केवलानंद सरस्वती, स्वामी रामानंद तीर्थ ही उदाहरणे डोळयासमोर ठेवली पाहिजेत’, असेही ते म्हणाले.
डॉ.दीपक पवार म्हणाले,’हिंदी ही राष्ट्रभाषा आहे,हा गैरसमज निर्माण करण्यात आला आहे.हिंदी भाषा सक्तीच्या आग्रहामागे हिंदी-हिंदुस्थान-हिंदुत्ववाद मानणाऱ्यांचे राजकारण असून मराठी माणसाने त्याला बळी पडू नये.भाषा टिकली नाही तर प्रदेश टिकणार नाही,बोली टिकणार नाही.महाराष्ट्रात मराठी भाषेलाच प्राधान्य मिळाले पाहिजे.त्यासाठी प्रत्यक्ष लढ्यात मराठी माणसाने उतरले पाहिजे.अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने मराठीच्या प्रसारासाठी ५०० कोटी मिळतील,असे समजणाऱ्यानी केंद्र सरकारने अशा कारणासाठी पूर्वी किती निधी दिला,याचा हिशेब काढून पाहिले पाहिजे.सकाळी मराठी आणि सायंकाळी हिंदुत्ववादी झाल्याने मराठी माणसाचे शिवसेना आणि मनसेचे झाले तसे नुकसान होणार आहे.
‘इतिहासातील थरारक प्रसंग आपण आठवत राहतो मात्र त्याकाळातील भाषा व्यवहार आठवत नाही.मराठी माणसाने दिल्लीवर राज्य केले पण मराठी भाषेला मोठे केले नाही.मराठी शाळेत शिकणे,मराठीत बोलणे आवश्यक आहे,नोकरी-व्यवसायात प्रतिनिधित्वाचा आग्रह धरला पाहिजे.परप्रांतीयांनी मराठी बोलण्याचा आग्रह धरला पाहिजे.मराठी फक्त आडनावाचे मराठी राहून उपयोगी नाही.मराठी समाजाचे अघोषित हिंदीकरण होतेय,हिंदूकरण होते आहे,त्याला विरोध केला पाहिजे.हिंदी भाषेच्या पोटातून देशांतर्गत वसाहतवाद येत आहे.त्याबाबत सावध राहिले पाहिजे’,असेही डॉ.पवार यांनी सांगितले.
अन्वर राजन म्हणाले,’आणीबाणी आणि त्यापूर्वी जनसंघाला अनेक पक्षांनी तत्कालिन कारणांनी जवळ केले.काँग्रेसचा वैचारिक घसरण झाल्याने आणीबाणीत पराभव झाला.पण, त्यानंतर काँग्रेस मध्ये सुधारणा झाल्या. पराभवानंतर सुधारणा होत जातात’.

