पुणे-साताऱ्यात होणाऱ्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांची निवड झाली आहे. आज पुण्यात झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा देणाऱ्या समितीचे अध्यक्ष रंगनाथ पठारे यांची नावे चर्चेत होती, परंतु या सर्वांनी आधीच नकार दिल्याने विश्वास पाटील यांच्या नावाची निवड निश्चित मानली जात होती.
जानेवारीत पार पडणार साहित्य संमेलन
साताऱ्यात जानेवारी महिन्यात 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद, शाहूपुरी शाखा आणि मावळा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन पार पडेल. नुकतेच मराठी भाषा मंत्री उदय सामंत आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले होते.
मराठी साहित्यातील एक मोठे नाव
विश्वास पाटील हे मराठी साहित्यातील मोठे नाव असून, ते एक प्रसिद्ध व लोकप्रिय कादंबरीकार आहेत. ते त्यांच्या संशोधनपूर्ण आणि प्रभावी लेखनशैलीसाठी ओळखले जातात. ‘पानिपत’ ही त्यांची गाजलेली ऐतिहासिक कादंबरी आहे. या कादंबरीसाठी त्यांनी केलेला सखोल अभ्यास, भाषेतील ओघवतेपण, आणि ऐतिहासिक घटनांचे नाट्यमय चित्रण यामुळे त्यांचे लेखन वाचकांना आकर्षित करते. त्यांच्या लेखनात मानवी भावनांचे आणि पात्रांच्या मानसिक संघर्षाचे जिवंत दर्शन घडते.
विश्वास पाटलांच्या उल्लेखनीय कांदबऱ्या
पानिपत – मराठ्यांच्या पानिपतवर झालेल्या पराभवावर ऐतिहासिक कादंबरी
झाडाझडती – राजकारण आणि समाज यामधील संघर्षाचे चित्रण.
सिंहासन – राजकीय सत्तासंघर्षावर आधारित.
चंद्रमुखी – समाजाच्या तळागाळातील वास्तव दाखवणारी प्रेमकहाणी.
महाड – अस्पृश्यता आणि सामाजिक अन्यायावर भाष्य करणारी कादंबरी.
स्मरणगंध – आत्मकथनात्मक आणि चिंतनशील लेखन.

