पुणे – पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज सकाळपासून पुण्यातील हडपसर मुंढवा भागात पाहणी दौरा करत आहेत. हा पाहणी दौरा सुरू असताना, अजित पवारांना स्थानिक नागरिकांच्या तीव्र प्रश्नांचा सामना करावा लागला. मुंढवा आणि केशवनगरमधील रहिवाशांनी पिण्याच्या पाण्याची समस्या, रस्त्यांची दुरवस्था आणि प्रचंड वाहतूक कोंडी यांसारख्या समस्या थेट त्यांच्यासमोर मांडल्या. एका स्थानिक महिलेने तर वाहतूक कोंडीच्या मुद्द्यावरून थेट गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासारखी ‘न सांगता’ पाहणी करण्याचा सल्ला अजित पवारांना दिला. त्यावर पर्रीकर कोण? असा प्रतिप्रश्न अजित पवारांनी त्या महिलेला विचारला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केशवनगर-मुंढवा येथे नव्याने बांधल्या जाणाऱ्या पुलाची पाहणी करून त्यांनी कामाच्या गुणवत्तेची माहिती घेतली आणि संबंधित अधिकाऱ्याला आवश्यक सूचना दिल्या. पुलाचे काम अंतिम टप्प्यात असल्याने लवकरच या भागातील वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होण्याची शक्यता आहे. याशिवाय, त्यांनी कोंढवा आणि हडपसर येथील वाहतूक कोंडीच्या प्रश्नांवर लक्ष घालून अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. सकाळी सकाळी विकासकामांची पाहणी करायला आलेल्या पवारांना आज पुणेकरांच्या प्रश्नांचा आणि रोषाचा चांगलाच अनुभव आला.
हा पाहणी दौरा सुरू असताना, अजित पवारांना स्थानिक नागरिकांच्या तीव्र प्रश्नांचा सामना करावा लागला. मुंढवा आणि केशवनगरमधील रहिवाशांनी पिण्याच्या पाण्याची समस्या, रस्त्यांची दुरवस्था आणि प्रचंड वाहतूक कोंडी यांसारख्या समस्या थेट त्यांच्यासमोर मांडल्या. एका स्थानिक महिलेने तर ‘तुम्ही सांगून येऊ नका जसे गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर न सांगता रहदारीचा आढावा घ्यायचे तसेच तुम्ही या, असा सल्ला अजित पवारांना दिला.
स्थानिक नागरिकांनी आपल्या व्यथा मांडताना, “इथल्या समस्या पाहता आम्ही इथे राहायचे की नाही?” असा संतप्त सवाल विचारला. यावर अजित पवारांनी हा भाग पीएमआरडीए आणि पुणे महानगरपालिकेच्या वादात अडकल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना फोन करून नागरिकांना सुविधा पुरवण्यासाठी काय उपाय करता येतील यावर चर्चा केली.
यावेळी एक स्थानिक महिला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झालेला संवाद
अजित पवार : तुम्ही येण्याआधीच आम्ही तुमच्या समस्या ऐकल्या आहेत. निवेदन मिळाले आहे. पीएमसी आणि पीएमआरडीए या वेगवेगळ्या एजन्सीज असल्या तरी, नागरिकांना त्यांच्या सुविधांशी देणेघेणे आहे आणि आम्ही त्यांच्या मागणीशी पूर्णपणे सहमत आहोत. यावर आमचे काम सुरू आहे. उशीर झाल्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आम्ही कामांना गती देण्यासाठी आणि प्राथमिकता देण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
महिला : आम्हाला तुमच्याकडून खूप आशा आहेत. पर्रीकर ज्याप्रमाणे दिवसा वाहतूक कोंडी पाहण्यासाठी फिरायचे, त्याचप्रमाणे तुम्हीही कधीतरी अचानक येऊन पाहा.
अजित पवार : पर्रीकर कोण?
महिला : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर. ते जसे अचानक फिरायचे, तसेच तुम्हीही फिरून पाहा आणि न सांगता भेट द्या. आम्ही प्रश्न विचारू आणि तुम्ही उत्तर द्याल, असे नको.
अजित पवार : मी इथे प्रश्न विचारायला आलेलो नाही. इथला परिसर ठीक व्हावा आणि समस्या सुटाव्यात यासाठीच मी स्वतः प्रयत्न करत आहे.
महिला : असे नाही सर, इथल्या समस्या पाहता इथे राहायचे की नाही, असा प्रश्न आम्हाला पडला आहे.

