पुणे, १३ सप्टेंबर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी हडपसर येथे “जनसंवाद” या अभियानाची सुरुवात केली. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिक थेट शासकीय यंत्रणेशी गेले असून यामध्ये व्हॉट्सअॅ चॅटबॉट्स, डिजिटल किऑस्क्स आणि मिस्ड कॉल क्रमांकासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला. पारदर्शक तक्रार निवारण प्रणालीमुळे शेकडो नागरिकांना त्यांच्या समस्या थेट अधिकाऱ्यांपर्यंत सहज पोहचवता आल्या. तक्रार नोंदवणे, अधिकारी वर्गाकडे पोहोचवणे, विभागीय समन्वयातून त्यावर तोडगा काढणे आणि नियमित फॉलो-अप अशी सुसज्ज यंत्रणा जनसंवाद या अभियानात राबविण्यात आली आहे.
हे अभियान अनेक महिन्यांच्या सर्वेक्षणांनंतर आणि जनतेशी केलेल्या प्रत्यक्ष संवादानंतर तयार करण्यात आले आहे. नागरी सेवांमधील तसेच विविध विभागांच्या कामकाजातील तफावत दूर करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. ‘जनसंवाद’ हे केवळ तक्रार निवारणाचे व्यासपीठ नसून या माध्यमातून पारदर्शकता व जबाबदारी निश्चित करणारी व्यवस्था तयार करण्यात आली आहे.
हडपसर येथे झालेल्या कार्यक्रमात तब्बल ३० शासकीय विभाग सहभागी झाले होते. या ठिकाणी नागरिकांनी ४ हजारांहून अधिक तक्रारी मांडल्या, त्यापैकी १५०० पेक्षा अधिक तक्रारींचे निराकरण जागीच करण्यात आले. तक्रारींमध्ये पाणीपुरवठा आणि वाहतूक कोंडी संबंधित मुद्दे विशेषतः मोठ्या प्रमाणात नोंदविले गेले. अजित पवार यांनी स्वतः सकाळपासून, दुपारचे जेवण न घेता, दुपारी उशिरापर्यंत संपूर्ण प्रक्रियेवर स्वतः लक्ष घालून जास्तीत जास्त समस्यांवर तोडगा काढला.
प्रत्यक्ष संवाद, शासकीय यंत्रणेचा पाठिंबा आणि अत्याधुनिक डिजिटल साधनांचा वापर या त्रिसूत्रीवर आधारलेला ‘जनसंवाद’ हा पुण्यातील पहिलाच प्रयोग ठरला आहे. नागरिक, शासकीय विभाग आणि राजकीय नेतृत्व यांना एका व्यासपीठावर आणत, लोकप्रतिनिधी आणि जनतेमधील विश्वासाची वीण अधिक मजबूत करण्याचे काम या उपक्रमातून साध्य झाले.
या मोहिमेअंतर्गत नागरिकांना विभागनिहाय डिजिटल किऑस्क्स, व्हॉट्सअॅप चॅटबॉट आणि हेल्पलाईन क्रमांकाद्वारे तक्रारी नोंदविण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. प्रत्येक तक्रार नोंदवून तिचे नियमानुसार परीक्षण व पाठपुरावा केला जात असल्याने वेळेवर कारवाई करणे सोपे झाले आहे.
हडपसरनंतर ही मोहीम राज्यभर राबविण्यात येणार असून, जनतेशी सातत्यपूर्ण संवाद राखत जबाबदार शासन निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

