पुणे-देवदर्शनाच्या निमित्ताने पत्नीची सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी येथील खोल दरीत ढकलून देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. भयंकर म्हणजे दरीत ढकलल्यानंतर महिला एका झाडाला अडकली. त्यानंतर आरोपी पतीने दरीत उतरून पुन्हा तिचा साडीने गळा आवळून खून केला व नंतर पुन्हा मृतदेह दरीत ढकलून दिला. या प्रकरणी अमोलसिंग याने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात पोलिसांकडे दिली होती. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत होता. अमोलसिंगने दिलेल्या माहितीनुसार, पोलिस बेपत्ता झालेल्या ललिता जाधवचा शोध घेत होते. त्यानंतर तपासात पोलिसांच्या हाती या हत्याकांडाचे महत्त्वाचे धागेदोरे लागले. त्यानंतर चौकशीसाठी आरोपीला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने सुरुवातीला पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. पण नंतर पाेलिसी खाक्या दाखविताच त्याने पत्नीच्या खुनाची कबुली दिली.
अमोलसिंग मुरली जाधव (26) असे आरोपी पतीचे नाव आहे. तर ललिता अमोलसिंग जाधव (वय-38 रा. भैरवनाथ मंदिराजवळ, फुलगाव, ता. हवेली, जि. पुणे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिस हवालदार प्रताप आव्हाळे यांनी याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दिली आहे.
अमाेलसिंग याने कुटुंबीयांच्या दबावामुळे वयाने मोठी असलेल्या ललिताशी विवाह केला होता. दोघांमध्ये तब्बल 12वर्षांचे अंतर होते. यावरून त्याचा पत्नीशी नेहमीच वाद होत होता.ती मंदबुद्धी असल्याचा त्यास संशय होता ,तसेच वयाने मोठी असल्याने पत्नीला त्याने सोडचिठ्ठी देण्यास सांगितले. पण ललिताने सोडचिठ्ठी देण्यास ठाम नकार दिला. यामुळे त्याने तिचा कायमचा काटा काढण्याचा निश्चय केला होता.
28 ऑक्टोबर 2023 रोजी आरोपीने आपल्या पत्नीला सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी येथे दर्शनासाठी नेले. यासाठी त्याने भाड्याने कार आणली. मांढरदेवी परिसरात पोहोचल्यानंतर त्याने कारचालकाला कार वाहनतळावर लावण्यास सांगितले. त्यानंतर दोघे जण मांढरदेवी घाटातून चालत निघाले. घाटात ललिताशी गप्पा मारण्याचा त्याने बहाणा केला. दरीजवळ थांबलेल्या ललिताला त्याने अचानक धक्का दिल्याने ती दरीत कोसळली. पण सुदैवाने दरीत कोसळल्यानंतर ललिता एका झाडाच्या फांदीत अडकली. हे लक्षात येताच अमोलसिंग स्वतः दरीत उतरला. त्याने ललिताचा साडीने गळा आवळून खून केला. ती मयत झाल्याची खात्री केल्यानंतर मृतदेह दरीत ढकलून तो पसार झाल्याची माहिती तपासात उघड झाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे8888001234 अधिक तपास करत आहेत.

