मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमेरिकेतील आयोवा राज्याच्या गव्हर्नर किम रेनॉल्ड्स यांनी मुंबई येथे ‘महाराष्ट्र सरकार आणि अमेरिकेतील आयोवा राज्य’ यांच्यातील ऐतिहासिक सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
या कराराद्वारे कृषी व कृषी तंत्रज्ञान, डिजिटलायझेशन, आरोग्य, पर्यटन, क्रीडा, जैवतंत्रज्ञान, वित्तीय सेवा, अक्षय ऊर्जा, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये दोन्ही राज्य एकत्रित काम करणार आहेत. विशेषतः कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), यांत्रिकीकरण आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी आयोवा विद्यापीठ आणि महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठ एकत्र संशोधन करतील.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आयोवा हे अमेरिकेचे ‘फुड बास्केट’ म्हणून ओळखले जाते आणि या सहकार्यातून महाराष्ट्रातील शेती आणि अन्नप्रक्रिया उद्योगाला मोठा फायदा होणार आहे. क्लायमेट-रेझिलियंट ॲग्रीकल्चर, बायोफ्युएल्स आणि नवीकरणीय ऊर्जा या क्षेत्रांत दोन्ही राज्ये सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करतील.
तसेच, नवी मुंबईतील एड्यु सिटी प्रकल्प, व्यावसायिक प्रशिक्षण, इनोव्हेशन आणि स्टार्टअप्ससाठी निर्माण होणारे वातावरण या करारामुळे अधिक बळकट होईल. आयोवाचे शिष्टमंडळ भारतात येईल तर महाराष्ट्राचे शिष्टमंडळ आयोवाला भेट देऊन परस्पर राज्यातील विविध क्षेत्रातील ज्ञानाचा उपयोग दोन्ही राज्याच्या विकासासाठी होणार असून, यामुळे दीर्घकालीन भागीदारीला गती मिळेल.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, जगभरातील गुंतवणूकदार महाराष्ट्राकडे आकर्षित होत आहेत. ‘इज ऑफ डूइंग बिझनेस’च्या अनुषंगाने गुंतवणूकदारांसाठी सुलभ वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही विविध सुधारणा व नवनवीन धोरणे सातत्याने राबवत आहोत.
यावेळी आयोवा राज्याचे शिष्टमंडळ, मुंबई येथील अमेरिकन दूतावासाचे अधिकारी व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

