विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा वाढदिवस संपन्न
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा वाढदिवस आज (१२ सप्टेंबर) उत्साहात साजरा झाला.यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. सामाजिक, राजकीय, साहित्यिक, सांस्कृतिक आणि विविध क्षेत्रांतून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव झाला. या शुभेच्छांना प्रतिसाद देताना डॉ. गोऱ्हे यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.
त्यांनी सांगितले की, “माझ्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर जनतेचे, शिवसैनिकांचे आणि विविध क्षेत्रांतील कार्यकर्त्यांचे प्रेम व आशीर्वाद मिळत आले आहेत. आज वाढदिवसाच्या निमित्ताने मिळालेल्या शुभेच्छांनी माझा उत्साह आणखी वाढवला आहे. या सर्वांच्या प्रेमामुळेच माझ्या कार्याला नेहमी नवी दिशा मिळते.”
आभार प्रदर्शन करताना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिवंगत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी असलेल्या नात्याच्या आणि आठवणींच्या काही खास गोष्टींनाही उजाळा दिला. त्यांनी सांगितले की, “राजकारणात प्रवेश केल्यावर मला बाळासाहेबांचा आशीर्वाद लाभला. त्यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे एक वेगळी शाळा होती. त्यांच्याशी संवाद साधताना त्यांनी दिलेल्या सूचनांमधून आणि मार्गदर्शनातून मी अनेक गोष्टी शिकले. समाजातील वंचित, उपेक्षित आणि महिला वर्गासाठी काम करताना नेहमीच त्यांचा प्रेरणादायी विचार माझ्यासोबत असतो.”
त्यांनी पुढे नमूद केले की, बाळासाहेबांसोबतच्या भेटीगाठी नेहमीच साध्या पण प्रेरणादायी असत. त्यांच्या सहजसुंदर व्यक्तिमत्त्वामुळे प्रत्येकाला जवळीक वाटे. “ते केवळ पक्षप्रमुख नव्हते, तर एक मार्गदर्शक होते. समाजातील सामान्य माणसाचा आवाज बनण्याची ताकद त्यांनी आम्हाला शिकवली,” असे त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले.
डॉ. गोऱ्हे यांनी या प्रसंगी कार्यकर्त्यांशी संवाद साधत आपल्या आगामी कार्याचा आराखडाही अधोरेखित केला. “महिला सक्षमीकरण, श्रमिकांचे प्रश्न, सामाजिक न्याय आणि सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडवणे हे माझे प्राधान्यक्रम आहेत. बाळासाहेबांच्या शिकवणीप्रमाणे लोकांशी जोडलेले राहणे आणि त्यांच्या प्रश्नांचे निराकरण करणे हेच माझे ध्येय आहे,” असे त्या म्हणाल्या.
डॉ. नीलम गोऱ्हे यांचे सामाजिक व राजकीय आयुष्य आजवर अनेक चढ-उतारांमधून गेलेले आहे. त्यांनी महिलांच्या प्रश्नांवर सातत्याने लढा दिला, शेतकरी व श्रमिकांच्या समस्या मांडल्या आणि विविध जनकल्याणकारी उपक्रम घडवले. त्यांच्या कामाची दखल घेऊनच आज विविध क्षेत्रांतून त्यांना शुभेच्छांचा आणि अभिनंदनाचा वर्षाव झाला.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार श्रीकांत शिंदे, सत्यजित देशमुख, मनीषा कायंदे, बाळासाहेब थोरात, सचिन अहिर, विजया रहाटकर, रूपाली चाकणकर, मीना कांबळी, अर्जुन खोतकर, माधुरी मिसाळ आणि अनिता बिरजे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी दूरध्वनी व विविध समाज माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या.

