पुणे-गणेशोत्सव झाला, नवरात्र येईल, नंतर दिवाळीतले फटाके, वर्षभर महापुरुषांच्या होणाऱ्या जयंती मिरवणुका, दांडगे विवाह सोहळे असे बरेच काही रस्त्यावर, सार्वजनिक जागेवर सुरू असते. त्यात आपण सारे उत्साहाने, आनंदाने सहभागी होतो. फक्त आक्षेप येतो तो गोंगाट, कर्णकर्कश आवाजावर. कायदा आहे, नियम आहे, त्यावर न्यायालयाचे निर्देश आहेत. त्यानंतरही ध्वनी प्रदूषण प्रत्येक वर्षी होते, प्रत्येक गावात होते. यंत्रणा कारवाईसुद्धा करतात. यावर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीत महाराष्ट्रात लातूर जिल्ह्यात तसेच सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर शहरांत डीजे वाजला नाही. त्यामुळे या शहराचे कौतुक सर्वत्र होत आहे. दरम्यान, कलावंत ढोल ताशा पथकाने मोठी मागणी केली आहे. सर्व उत्सव डी जे मुक्त झाले पाहिजेत. असे कलावंत पथकाने म्हटले आहे.
सार्वजनिक उत्सवांच्या मिरवणुकांमध्ये वाढत्या डॉल्बी आणि साउंड सिस्टिम्सच्या वापरा विरोधात कलावंत ढोल ताशा पथकाच्या कलाकारांकडून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. “डीजेवर बंदी घालावी” या मागणीसाठी रविवारी पुण्यात स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली असून, या मोहिमेत अनेक मराठी कलाकार सहभागी होणार आहेत. या मोहिमेतून गोळा करण्यात येणाऱ्या स्वाक्षऱ्या व निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे सुपूर्द केले जाणार असल्याची माहिती अभिनेते सौरभ गोखले यांनी दिली आहे.
कलावंत ढोल पथकाच्या नेमक्य मागण्या काय?
धार्मिक व सांस्कृतिक उत्सवांतील मिरवणुका, महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी निमित्त शोभायात्रांमध्ये डीजे/डॉल्बी व तत्सम मोठ्या ध्वनीप्रणालींना सक्त मनाई करावी.
आवाजामुळे स्थानिक रहिवाश्यांना होणारा त्रास, शारीरिक हानी (जसे की बहिरेपणा) तसेच वाहतूक कोंडीस आळा घालावा.
मिरवणुकांमध्ये पारंपरिक वाद्य व कलाप्रकारांना प्रोत्साहन द्यावे. ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी स्वतंत्र नियमावली तयार करावी.
कलावंत ट्रस्टकडून नागरिकांना आवाहन
प्रत्यक्ष येऊन स्वाक्षरी करून किंवा डिजिटल पिटीशन साइन करून या मोहिमेला पाठिंबा द्यावा. डिजिटल पिटीशनसाठीची लिंक कार्यक्रमाच्या दिवशी उपलब्ध करून देण्यात येईल. परंपरागत वाद्यांचा गजर आणि संस्कृतीचे जतन या उद्देशाने ही मोहीम राबवली जात असल्याचे कलावंतांनी स्पष्ट केले.
कलावंत पथकाला मार्केट यार्ड गणेशोत्सव मंडळाने विसर्जन मिरवणुकीसाठी आमंत्रित केलं… त्याप्रमाणे पूर्ण पथक ठरल्यावेळी सायंकाळी 6 वाजता वादनासाठी तयार असून आणि मंडळाने सर्वतोपरी प्रयत्न करू नये टिळक रोडवरील विसर्जन मिरवणूक एक इंचही पुढे न सरकल्याने ठीक रात्री 9 वाजता असलेल्या जागी एक गजर करून, ध्वजवंदन करून वादनास विराम देण्याचा निर्णय घ्यावा लागला. याबद्दल पथकाने पोस्ट करत चाहत्यांची माफी मागत खंत व्यक्त केली होती.

