मुंबई-गुजरातच्या कांडला येथून मुंबईला येणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाच्या लँडिंग गिअरचे एक चाक निखळल्याने मुंबई विमानतळावर त्याचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. या विमानातून प्रवास करणारे सर्व 75 प्रवासी सुखरूप आहेत. विमानतळ प्रशासनाच्या तत्परतेमुळे एक मोठा अपघात टळला. विशेष म्हणजे, विमानाचे चाक हे कांडला धावपट्टीवर आढळून आले आहे. त्यानंतरही ते उड्डाण करत मुंबईत आले.
ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. स्पाइसजेटच्या बॉम्बार्डियर Q400 विमानाने कांडला विमानतळावरून मुंबईसाकडे उड्डाण घेतल्यानंतर धावपट्टीवर विमानाचे एक चाक पडलेले आढळून आले. याबाबत तात्काळ माहिती मिळाल्यानंतरही, वैमानिकाने विमानाचा प्रवास सुरू ठेवला. तातडीने मुंबई विमानतळ प्रशासनाला सूचित करण्यात आले. त्यानंतर मुंबई विमानतळावर ‘पूर्ण आपत्कालीन स्थिती’ घोषित करण्यात आली. कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने सर्व यंत्रणांना ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला. मुंबईतील इतर सर्व विमानांचे उड्डाण आणि लँडिंग तात्पुरते थांबवण्यात आले.
या काळात विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यासाठी धावपट्टीवर आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली. त्यानंतर वैमानिकाने अतिशय कौशल्याने हे विमान धावपट्टीवर यशस्वीरीत्या उतरवले. विमानातील सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असून, या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. या प्रसंगावधानाने मोठी जीवितहानी टळली असल्याचे एअरपोर्ट अथॉरिटीने स्पष्ट केले आहे.
या घटनेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि प्रवाशांना कोणताही धोका पोहोचला नाही. या घटनेची दखल घेऊन नागरी विमान वाहतूक महासंचालनालय पुढील तपास करत आहे.

