पुणे-बिनशर्ट, बिनशर्ट म्हणता म्हणता त्यालाच बिनशर्त तीनदा भेटले, अशा शब्दांत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी राज ठाकरे यांची वारंवार भेट घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे केवळ आणि केवळ सत्तेच्या खुर्चीसाठी आपल्या मशालीला इंजिनाचे वंगण फासत असल्याची टीकाही त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधताना केली आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पलटवार केला आहे.
सुषमा अंधारे यांनी ट्विट करत केशव उपाध्ये यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, केशवजी बात निकलेगी तो दूर तक जाएगी. मुलुंडच्या एचडी व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट यांनी ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप केले ते सगळे आता तुमच्या अंगाखांद्यावर खेळत आहेत, असे म्हणत अंधारे यांनी निशाणा साधला आहे.
पुढे सुषमा अंधारे म्हणाल्या, ज्या नितेश राणे यांनी फडणवीसांची हाफ चड्डीवाले म्हणून संभावना केली ते आता चाहते आहेत. फडणवीसांची नवाब मलिक, भुजबळ साहेब आणि अजितदादा यांच्याबद्दलची विधान तुमच्या चांगलीच लक्षात असतील की व्हिडिओ स्वरूपात लावावीत? असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला. तसेच वेगळा विदर्भ झाल्याशिवाय ते लग्नही करणार नव्हते हे सुद्धा आठवतच असेल तुम्हाला? मनसे उनसे हे सांगणारे सुद्धा फडणवीसच न? असा खोचक सवालही अंधारे यांनी उपस्थित केला.
फडणवीसांच्या एका मुख्यमंत्री पदाच्या महत्वकांक्षेपायी काँग्रेसमुक्त म्हणता म्हणता भाजपा काँग्रेसयुक्त झाली. तुमच्यासारख्या निष्ठावान लोकांची फडणवीसांनी माती केली. यावर चिंतन करणे हे तुमच्या अधिक फायद्याचे राहील, असा सल्लाही सुषमा अंधारे यांनी केशव उपाध्ये यांना दिला आहे.
केशव उपाध्ये काय म्हणाले होते?–बिनशर्ट, बिनशर्ट म्हणता म्हणता त्यालाच बिनशर्त तीनदा भेटले. केवळ आणि केवळ सत्तेच्या खुर्चीसाठी आता मशालीला इंजिनाचे वंगण फासले, असे ट्विट करत केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांची घेतलेल्या भेटीवर टीका केली आहे. तसेच, चरणस्पर्श कधी शिवतीर्थाचा तर जनपथावरि कधी लोटांगण, विचारांचे लोणी गेले, पालिकेची मलई गेली नाचता येईना वाकडे अंगण, असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टोलाही लगावला होता.

