पुणे-अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या वतीने शिक्षक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरवात प्रमुख पाहुणे प्रख्यात व्याख्याते गणेश शिंदे, कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते उदय जगताप, संस्थेच्या सरचिटणीस .प्रमिलाताई गायकवाड, संयुक्त चिटणीस वासंती बोर्डे,अजय पाटील, खजिनदार धैर्यशील वंडेकर,के. टी. सोनावणे, नियामक मंडळाच्या अध्यक्ष कमलताई व्यवहारे यांचे हस्ते माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या प्रसंगी संस्थेच्या विविध शाखांमधील शिक्षकांचा अध्यापनात विशेष नैपुण्य मिळविल्याबद्दल व ग्रंथपाल, क्रीडा संचालक, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी, कार्यालय अधिक्षक यांचा प्रमुख पाहुण्याच्या हस्ते विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी गणेश शिंदे यांनी राजर्षी शाहू महाराजांचा वारसा अविरतपणे चालविणाऱ्या, बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणून गोरगरीब, ग्रामीण भागातील मुलांच्या राहण्याची, जेवणाची सोय करून शिक्षणाची द्वारे खुली करणाऱ्या स्व. उत्तमराव पाटील यांच्या कार्याचे स्मरण केले. आजच्या बदलत्या शिक्षण पद्धतीवर बोलत असताना समाजाचा खरा शिल्पकार म्हणून शिक्षकांची भूमिका खूपच महत्त्वाची असल्याने शिक्षकांनी काळाबरोबर नव तंत्रज्ञान अवगत करून स्वतः अपडेट हवे. समाजातील वाईट विचार दूर करून विद्यार्थ्यांच्या मनात चांगले विचार रुजविण्याचे काम शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी एकरूप होऊन केले पाहिजे. आजची बेरोजगारी पहाता विद्यार्थ्यांना उद्योजक होण्याचे बळ देऊन कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे या साठी विद्यार्थ्याला जीवन जगण्याची कौशल्य देणारे विद्यापीठ म्हणजे शिक्षक होय. समाजाचा उद्धार करण्यासाठी तत्त्वज्ञानाने परीपूर्ण , तांत्रिक कुशल विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षकांनी अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन ज्ञानदान करावे. तंत्रज्ञानाचा विद्यार्थ्याच्या प्रतिभेवर परिणाम होणार नाही यासाठी नेहमी प्रयत्नशील असले पाहिजे अशी अपेक्षा या प्रसंगी व्यक्त केली. उदय जगताप यांनी स्वतःच्या खडतर शैक्षणिक प्रवासाचे उदाहरण देऊन शिक्षण व्यवस्थेतील बदल, आईवडिलांचा आदर, जीवनातील संस्काराचे महत्व सांगून समाजातील वास्तवाची जाणीव या प्रसंगी करून दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या सरचिटणीस प्रमिलाताई गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन संयुक्त चिटणीसअजय पाटील यांनी केले. सत्कारार्थीच्या वतीने डॉ. प्रवीण जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.

