स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस् चे रशियातील आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सादरीकरण
पुणे : भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस् ने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा लोककलेचा सांस्कृतिक ठसा उमटवला आहे. रशियातील व्लादिमिर येथे झालेल्या गोल्डन रिंग इंटरनॅशनल फोल्कलोर फेस्टिव्हल मध्ये विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र व आसाम येथील लोकनृत्य प्रकार लावणी, गोंधळ, बिहू व भोरताल सादर केले.
भारतीय विश्वविद्यालय संघ, नवी दिल्ली व रशियाच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या निमंत्रणावरून या महोत्सवात सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला प्रेक्षकांनी दाद दिली. या आंतरराष्ट्रीय महोत्सवात भारतासह तब्बल १० देशांतील संघांनी सहभाग नोंदवला. भारती विद्यापीठाचे स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस् मधील १० विद्यार्थी व संचालक प्राध्यापक प्रा. शारंगधर साठे यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, प्र-कुलगुरू डॉ. विश्वजीत कदम व कुलगुरू डॉ. विवेक सावजी यांनी अभिनंदन केले.
प्रा. शारंगधर साठे म्हणाले, भारतीय लोककलेच्या परंपरेकडे जगभरात आदराने पाहिले जाते. आंतरराष्ट्रीय महोत्सवात भारताचे प्रतिनिधित्व विद्यार्थ्यांनी केले. विद्यार्थ्यांनी मेहनत, सराव आणि जिद्दीने उत्कृष्ट सादरीकरण करून भारताची मान उंचावली आहे. जागतिक मंचावर आपल्या लोकनृत्यांना इतका मोठा प्रतिसाद मिळणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.

