सांगली -मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मनोज जरांगे व मंत्री छगन भुजबळ यांच्यातील वाद एका नव्या उंचीवर पोहोचला आहे. त्यातच आता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जरांगेंना सरकारला अल्टिमेटम न देता सरकारने मान्य केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी कशी होईल यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला दिला आहे.चंद्रकांत पाटील गुरूवारी सांगलीत पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. गाव पातळीवर समिती स्थापन झाली. गावात एखाद्या व्यक्तीकडे कुणबी दाखला असेल तर त्याचा भाऊबंद आहे, त्यालाही प्रतिज्ञापत्रावर सक्षम अधिकाऱ्याने पडताळणी करून दाखला द्यायचा आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्यामुळे, आता त्यांची अंमलबजावणी कशी होईल यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. सरकारने जरांगे यांच्या सर्वच मागण्या मान्य केल्यामुळे आता त्यांच्या आंदोलनाची धार कमी होईल असा दावाही मंत्री पाटील यांनी यावेळी बोलताना केला.
मनोज जरागे यांच्या आझाद मैदानावरील उपोषणानंतर महायुती सरकारने मराठवाड्यातील मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्यासाठी एक खास जीआर काढला. या जीआरवरून सध्या जरांगे व मंत्री छगन भुजबळ रोज आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. भुजबळ यांनी या शासन निर्णयाला कोर्टात आव्हान देण्याचा निर्णय दिल्यानंतर जरांगे यांनीही मंडल आयोगाच्या निर्णयाला आव्हान देत ओबीसी आरक्षणाच्या मुळावर घाव घालण्याची तयारी केली आहे. यामुळे महाराष्ट्राचे सामाजिक वातावरण गढूळ झाले असताना आता राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनोज जरांगे यांना आपल्या मागण्यांच्या अंमलबजावणीकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी छगन भुजबळांचीही मराठा आरक्षणाच्या जीआरमुळे ओबीसींचे कोणतेही नुकसान होणार नसल्याची खात्री पटत असल्याचाही दावा केला. छगन भुजबळ गत अनेक वर्षांपासून ओबीसी समाजाचे नेतृत्व करतात. त्यांच्यासाठी भांडतात. त्यामुळे ते ताक सुद्धा फुंकून पीत आहेत. त्यांची हळूहळू खात्री होत आहे की, यातून ओबीसींना कोणताही धक्का लागत नाही. त्यामुळे ते आपल्या सहकाऱ्यांना मराठा आरक्षणाच्या जीआरमुळे ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागत नसल्याचे समजावून सांगत आहे. बबनराव तायवाडे जसे आपल्या सहकाऱ्यांना सांगत आहेत, तसेच भुजबळही करत आहेत, असे ते म्हणाले. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी छगन भुजबळ यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचेही संकेत दिलेत.

