पुणे : मूल होत नसल्याच्या समस्येवर उपाय म्हणून मंत्रोच्चार आणि अंगारा लावून महिलेला पेढा देऊन एका मांत्रिकाने महिलेकडून तीन लाख १५ हजार रुपये उकळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.
सहकारनगर परिसरात हा प्रकार घडला असून, पोलिसांनी गिरीश बलभीम सुरवसे, वय ३६ वर्ष, रा. भोसरी, याच्यावर भारतीय न्याय संहिता व महाराष्ट्र नरबळी-जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी बालाजीनगर परिसरात राहणाऱ्या एका २६ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. आरोपी सुरवसे याला अटक करण्यात आली असून, त्याच्या एका साथीदाराचा शोध सुरू आहे. हा प्रकार २८ जुलै ते नऊ सप्टेंबर २०२५ या काळात घडला आहे.आरोपीने पीडितेला विश्वासात घेऊन मंदिरात नेले. तेथे मंत्रोच्चार करीत अघोरी विधी केल्याचे भासवले. त्यानंतर अंगाऱ्याचा पेढा खाण्यास देऊन सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा तीन लाख १५ हजारांचा ऐवज घेतला. आपली फसवणूक झाल्याच्या निदर्शनास आल्यानंतर पीडितेने तक्रार दिली. त्यानंतर सहकारनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवला.‘अंधश्रद्धेला बळी पडू नका. कोणत्याही संशयास्पद व्यक्तीने जादूटोणा, अंगारे किंवा चमत्कारिक विधींच्या नावाखाली पैसे, दागिने मागितल्यास तत्काळ पोलिसांना कळवा,’ असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

