मुंबई- 2012 मध्ये पुण्यात झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी फारुख बागवान याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. खटल्याची सुनावणी न झाल्यामुळे 12 वर्षे तुरुंगात घालवल्यानंतर त्याला हा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी याच प्रकरणातील दुसरा आरोपी असलम शब्बीर शेख यालाही 2023 मध्ये जामीन मिळाला होता.उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, प्रत्येक आरोपीला खटला जलदगतीने चालवण्याचा मूलभूत अधिकार आहे. मात्र, बागवानचा खटला नजीकच्या काळात पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. तसेच, इतर आरोपींप्रमाणेच त्याच्यावरही समान आरोप आहेत, त्यामुळे त्यालाही समानतेच्या आधारावर जामीन मिळण्याचा हक्क आहे. बागवानविरोधात या प्रकरणाशिवाय इतर कोणताही गुन्हा दाखल नसल्याचेही न्यायालयाने नमूद केले.
1 ऑगस्ट 2012 रोजी पुण्यातील जंगली महाराज रोडवर एकामागोमाग एक पाच बॉम्बस्फोट झाले होते. हे बॉम्ब डेक्कन परिसरातील सहा ठिकाणी ठेवण्यात आले होते. त्यापैकी पाच बॉम्ब काही मिनिटांच्या अंतराने फुटले, तर एक बॉम्ब निकामी करण्यात आला. सुदैवाने, बॉम्ब तयार करताना झालेल्या चुकीमुळे मोठी जीवितहानी टळली होती. या स्फोटांमध्ये एक व्यक्ती जखमी झाली होती.या घटनेनंतर पुण्यात मोठी खळबळ उडाली होती. अनेकांना सुरुवातीला या स्फोटांचे गांभीर्य लक्षात आले नाही. पण, काही मिनिटांतच काही अंतरावर ठेवण्यात आलेले पाच बॉम्ब सलग फुटल्याने मोठा दहशतवादी हल्ला असल्याचे समोर आले होते. डेक्कर परिसर, बालगंधर्व रंगमंदिर, मॅकडोनाल्ड कॅफे, देना बँक, गरवारे पूल या पाच ठिकाणी हे बॉम्ब ठेवण्यात आले होते.
याच प्रकरणातील अन्य आरोपींनाही यापूर्वी जामीन मिळाला आहे. 19 जानेवारी 2023 रोजी आरोपी असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागीरदारला देखील मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्यामुळे, इतर आरोपींप्रमाणेच समानतेच्या आधारावर बागवानलाही जामीन मिळण्याचा हक्क असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. बागवान विरोधात या प्रकरणाव्यतिरिक्त कोणताही गुन्हा दाखल नाही, असेही कोर्टाने स्पष्ट केले. या निर्णयामुळे आरोपी फारुख बागवानची लवकरच तुरुंगातून सुटका होणार आहे.

