अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष श्री डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकेस अधिक शक्तिशाली राष्ट्र बनविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. कुठल्याही राष्ट्र प्रमुखाचेच नव्हे तर,त्या त्या देशातील सर्व यंत्रणा आणि सर्व सामान्य नागरिकांचे हेच ध्येय असले पाहिजे. त्यामुळे
डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकेस अधिक शक्तिशाली राष्ट्र बनविण्याचे ध्येय असेल तर ते अजिबात वावगे नाही. “अमेरिकन फर्स्ट” हे त्यांचे ब्रीद जगजाहीर आहे.
पण मुळात मला प्रश्न असा पडतो की,”मूळ किंवा खरा” अमेरिकन कुणास म्हणावे ?
कारण अमेरिकेचा इतिहास पाहिला तर असे दिसते की,
मूळ अमेरिकन लोक
सुमारे १२ हजार वर्षांपूर्वी “आशिया” खंडातून अलास्कामार्गे उत्तर आणि दक्षिण अमेरिका खंडात स्थलांतरित झाले.अशा या खंडावर २२ ऑक्टोबर १४९२ रोजी क्रिस्टोफर कोलंबस याने पहिल्यांदा पाऊल ठेवले.पुढे तिथे स्पॅनिश, फ्रेंच,डच,इंग्रज आदी युरोपीय लोकांनी वसाहती स्थापन केल्या. या वसाहतवाद्यांनी एकत्र येऊन स्वातंत्र्य युद्ध केल्यानंतर अमेरिकेने ग्रेट ब्रिटनपासून
४ जुलै १७७६ रोजी स्वातंत्र्य
मिळविले आणि हुकुमशाही, राजेशाही,लष्करशाही अशा अनेक प्रकारच्या शासन व्यवस्थांपैकी सर्वोत्कृष्ट ( परिपूर्ण नव्हे!) समजल्या जाणारी लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारली.
लोकशाहीचे कट्टर पुरस्कर्ते,
अमेरिकेचे १६ वे
राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी लोकशाहीची व्याख्या करताना म्हटले आहे की,
“लोकशाही म्हणजे लोकांचे, लोकांनी , लोकांसाठी चालविलेले राज्य होय”.पण आज मात्र दुर्दैवाने लोकशाही म्हणजे “लोकांकडून स्वतःला निवडून घेऊन मनमानी पद्धतीने राज्य कारभार करणे होय” असे चित्र दिसतेय.
अशा या अमेरिकेचे एकूण क्षेत्रफळ ९८,३३,५२० किमी इतके प्रचंड मोठे आहे. ५० राज्ये मिळून हे राष्ट्र बनलेले असल्याने त्याचे पूर्ण नाव
युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका असे आहे. कॅनडा, मेक्सिको हे अमेरिकेचे शेजारी देश आहेत.तर रशिया, कॅनडा व बहामाज् ह्या देशांच्या सागरी सीमा अमेरिकेला लागून आहेत.अमेरिका हा एक वेगळा खंड आहे,ही संकल्पना मांडणारा आणि ज्याच्यामुळे अमेरिका हे नाव पडले तो
अमेरिगो वस्पुची हा संशोधक
इटालियन होता.
आता इथे हे लक्षात घेतले पाहिजे की,”अमेरिकन फर्स्ट” असा नारा देणाऱ्या खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांचे मूळही जर्मन आहे. फ्रेडरिक ट्रम्प या त्यांच्या आजोबांचा जन्म नैऋत्य जर्मनीतील कॅलस्टॅड गावात १८८५ मध्ये झाला.
त्यांचे वडील फ्रेड ट्रम्प हे न्यू यॉर्क येथे रिअल इस्टेट डेव्हलपर होते.आई मेरी अँनी मॅकलिओड ट्रम्प ही स्कॉटिश होती.डोनाल्ड ट्रम्प यांचा जन्म १४ जून १९४६ रोजी न्यू यॉर्क शहरातील क्वीन्स बरो येथे झाला.त्यांचे प्राथमिक शिक्षण खाजगी क्यू-फॉरेस्ट स्कूलमध्ये
तर माध्यमिक शिक्षण यॉर्क मिलिटरी अकादमीमध्ये झाले.
पुढे ते फोर्डहॅम आणि पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात शिकले.त्यांनी बॅचलर ऑफ बिझीनेस ॲडमिनिस्ट्रेशन ची पदवी प्राप्त केली.
डोनाल्ड ट्रम्प यांनी वडिलांचा व्यवसाय हाती घेतल्यानंतर या व्यवसायाचे नाव
“ट्रम्प ऑर्गनायझेशन” असे ठेवले .
अमेरिकेत इंग्रजी शिवाय हवाईयन,सिओक्स या भाषाही बोलल्या जातात.वॉशिंग्टन डीसी ही अमेरिकेची राजकीय तर न्यूयॉर्क ही आर्थिक राजधानी आहे. डॉलर हे अमेरिकेचे चलन आहे.प्रत्येक देशाच्या चलनाची तुलना नेहमी डॉलर शी करण्यात येते,इतके ते “भारी” आहे.
अमेरिकेचे नाव दिलेली व्यक्ती इटालियन होती. तर खुद्द विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मूळ जर्मन आहेत,हे सर्व विस्ताराने सांगण्याचे कारण म्हणजे,अशा या एक नाही, दोन नाही , हजारो नाही तर लाखो,करोडो स्थलांतरित लोकांमुळे हा देश घडला आहे .त्यामुळे या देशाला “स्थलांतरितांचा देश “असेही म्हटले जाते .
आज मितीला अमेरिकेची लोकसंख्या ३४ कोटी हून अधिक आहे.त्यात चिनी वंशाच्या लोकांची संख्या पहिल्या क्रमांकावर म्हणजे
५ कोटी ५० लाख इतकी आहे.तर भारतीय वंशाच्या लोकांची संख्या ही त्या खालोखाल म्हणजे ५ कोटी
२० लाख इतकी आहे. अमेरिकेतील आजच्या भारतीयांकडे बघून आपल्याला असे वाटते की,गेल्या ४०/५० वर्षांपूर्वीच भारतीय तिकडे जायला सुरुवात झाली असेल. तर प्रत्यक्षात तसे नाही. कारण
अमेरिकेच्या भूमीवर १६३५ साली मजूर म्हणून नेलेला
आणि टॉम असे ख्रिश्चन नाव
ठेवलेला हा पहिला भारतीय आहे.टॉम हा व्हर्जिनिया तील जेम्स टाऊन येथील वस्तीच्या
हेडराइट मध्ये नोंदविण्यात आला होता.
अमेरिकेची वाटचाल ही कधीच साधी,सरळ,
शांततापूर्ण नव्हती. अनेक वांशिक, सामाजिक, आर्थिक, मानवी हक्क विषयक लढे, आंदोलने होत होत अमेरिकेचा विकास सुरू आहे.
आता या सर्व पार्श्वभूमीवर ट्रम्प साहेबांनी भारतासह अनेक देशांवर अनेक एकतर्फी
उद्योग,व्यापार, अमेरिकेत प्रवेश ,अमेरिकेत असलेल्या व्यक्तींविरुद्ध निर्बंध लावणे अशा एक ना अनेक उलटसुलट निर्णयांचा धडाका लावून सर्वांच्या काळजात धडकीच भरवली आहे.या त्यांच्या हडेलहप्पी कारभाराने
अमेरिकेतील निदान अर्धी लोकसंख्या आणि जगातील सर्व देश एकीकडे तर ट्रम्प आणि त्यांचे समर्थक दुसरीकडे अशी जगाची विभागणी होणे सुरू झाले आहे. अर्थात या निमित्ताने का होईना, जगातील सर्व देश एकत्र आले,बंधुभावाने राहू लागले तर जगात सुरू असलेली युद्धे थांबतील. बहुतेक प्रत्येक देशाचा सर्वाधिक निधी हा संरक्षणासाठी खर्च होत असतो. देशादेशांमध्ये परस्पर विश्वासाचे नाते निर्माण झाले तर हा सर्व निधी त्या त्या देशातील विकास कामांसाठी
खर्च होऊन जगातील लोक
शांततेने,सुखाने जगू शकतील.
पण ट्रम्प महाशयांनी अमेरिकेसह सर्व जगात जे गोंधळाचे,अशांतेतेचे,
अस्थिरतेचे वातावरण निर्माण केले आहे,ते भविष्यासाठी नक्कीच भयसुचक आहे. जगाला घडविण्यापेक्षा बिघडविण्याचे कामच सध्या
ट्रम्प यांच्याकडून सुरू आहे.
बरे ट्रम्प यांच्या उद्देशामागे अमेरिकेचा विकास हे एकमेव कारण असते तर बाब वेगळी होती. पण या उद्देशामागे धार्मिक,वांशिक,सामाजिक कारणेही असल्याचे दिसते.
अमेरिका हे जगातील सर्वात शक्तिशाली राष्ट्र म्हणून ओळखले जाते.स्वतः अमेरिका आजपर्यंत जगात “मोठा भाऊ” या दादागिरीच्या भूमिकेत राहिला आहे.त्यामुळे
ट्रम्प यांची आताची दादागिरी कशी रोखायची,तिला आळा कसा घालायचा, अमेरिकन काँग्रेस ला नेमके काय अधिकार आहेत,ट्रम्प साहेबांविषयी त्यांच्या पक्षात काय परिस्थिती आहे,असे एक ना अनेक प्रश्न आजच्या घडीला पडले आहेत.
या सर्व परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी ,जगाला नेहमी शांततेचा संदेश देत आलेल्या भारताने आणि भारतीयांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे असे मला वाटते. यातील पहिले पाऊल म्हणून अमेरिकन भारतीयांनी सहमतीने एक दिवस ठरवून, त्या दिवसाची सामूहिक रजा घ्यावी.त्यांच्या या रजा घेण्याने अमेरिकन अर्थ व्यवस्था, दैनंदिन जीवनावर काय, किती, कसा परिणाम होतो,हे दिसून येईल.आज अमेरिकेन भारतीय एकूण कराच्या जवळपास ५ ते ६ टक्के रक्कम भरतात. अमेरिकेतील ६० टक्के हॉटेल, मोटेल व्यवसाय भारतीयांकडे आहे. अमेरिकेतील अनेक छोटे मोठे उद्योग भारतीयांनी सुरू केले आहेत.अनेक वैद्यकीय,
अभियांत्रिकी ,माहिती तंत्रद्न्यान,तंत्रद्न्यान,संशोधन, शैक्षणिक प्रकल्पांमध्ये भारतीयांचे प्रमाण लक्षणीय आहे. कितीतरी उद्योग, व्यावसायिक, शैक्षणिक आणि इतर असंख्य संस्थांच्या प्रमुखपदी भारतीय वंशाच्या व्यक्ती आहेत. त्यामुळे या सर्वांनी एकत्र येऊन,सहमतीने एक दिवसाची सामूहिक रजा घेऊन आपल्या अस्तित्वाची, त्या अस्तित्वाची ,अमेरिकेच्या अस्तित्वासाठी असलेली अपरिहार्यतेची जाणीव ट्रम्प साहेबांना करून दिली पाहिजे. अमेरिकन भारतीयांचे अनुकरण इतरही लोक करतील .ट्रम्प यांच्या धोरणांशी,कार्य पद्धतीशी सहमत नसलेल्या व्यक्तीही त्यांच्या सोबत येतील आणि त्यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस अधिक बिघडत जाण्यापेक्षा तिला वेळीच आला बसण्यास मदत होईल असे मला वाटते.अर्थात यानेही
फार काही फरक न पडल्यास पुढे काय करायला हवे हे पुढचे पुढे ठरविता येईल.
_ देवेंद्र भुजबळ
९८६९४८४८००

