Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

99व्या संमेलनासाठी मराठी भाषा विभागाकडून अतिरिक्त एक कोटी : उदय सामंत

Date:

पुणे : मराठी भाषेची संस्कृती व परंपरा जतन करण्याची जबाबदारी फक्त साहित्यिकांची अथवा मराठी भाषिकांची नसून शासनाची देखील आहे. महायुतीच्या सरकारने हिंदी भाषेची सक्ती केलेली नाही. त्रिभाषा सूत्रासंदर्भात आधीच्या सरकारने स्थापन केलेली समिती शासकीय होती की त्या राजकीय पक्षाची होती या विषयी विश्लेषण व्हायला हवे, अशी भूमिका उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या व्यासपीठावर मांडली. आधुनिक जगाला सामोरे जाताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजधानीत होत असलेल्या संमेलनासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका मांडत मराठी भाषा विभागाकडून एक कोटी रुपयांचा अतिरिक्त निधीही त्यांनी जाहीर केला.
महाराष्ट्र साहित्य परिषद, शाहूपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशन आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण बुधवारी (दि. 10) ख्यातनाम हास्यचित्रकार शि. द. फडणीस यांच्या हस्ते झाले. त्या वेळी सामंत बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वयाची शंभरी पार केलेल्या शि. द. फडणीस यांनी हे बोधचिन्ह साकारले आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी अध्यक्षस्थानी होते तर महामंडळाच्या कार्यवाह सुनिताराजे पवार यांची सन्मानीय उपस्थिती होती. कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत मंचावर होते.
साहित्य संमेलनाच्या नियोजनातही मराठी भाषा विभाग सहभागी होईल, अशी ग्वाही देत उदय सामंत म्हणाले, मराठी भाषेची परंपरा आणि ठेवा जतन करण्यासाठी शालेय शिक्षणात साहित्यिकांवरील अभ्यासक्रम असणे आवश्यक आहे. तसेच इतर भाषांमधील उत्तमोत्तम साहित्य मराठी भाषेत अनुवादीत व्हावे याकरिता अनुवाद समिती स्थापन करण्याचे कार्य सुरू आहे. मराठी भाषेला परदेशातही मान मिळावा यासाठी विश्व मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे बालसाहित्य, महिला आणि युवा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचा मानस आहे.
मराठी बोलता येत नाही म्हणून त्याला मारणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. राज्यात राहणाऱ्या अनेक अमराठी व्यक्तींनी मराठी भाषा शिकण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अशा व्यक्तींना मराठी भाषेचे शिक्षण देण्यासाठी ॲप विकसित करण्यात येत आहे. बोधचिन्हासंदर्भात बोलताना उदय सामंत म्हणाले, हे बोधचिन्ह सरकारलाही बोध देणारे आहे. मराठी भाषेवर अन्याय होऊ नये आणि अन्याय करणाऱ्यांवर वार केला जावा हे या बोधचिन्हातून दर्शविले गेले आहे.
मराठी भाषेच्या विचाराला आणि संस्कार परंपरेला पुढे नेण्यात साहित्य संमेलनांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. सातारा येथे होणारे संमेलन नाविन्यपूर्ण आणि वेगळेपण दर्शविणारे तसेच पुढच्या संमेलनाला आदर्श दर्शविणारे ठरेल, असा विश्वासही मंत्री सामंत यांनी व्यक्त केला. मराठी भाषेच्या विकासासाठी उद्योजकांकडून सीएसआरअंतर्गत निधी संकलन करण्यात येत आहे. हा निधीही संमेलनासाठी देण्याची घोषणा त्यांनी केली.
रत्नागिरी जिल्ह्यालाही उत्तमोत्तम साहित्यिक आणि कलाकारांची परंपरा लाभली आहे. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होण्याची संधी मिळावी, अशी अपेक्षाही उदय सामंत यांनी व्यक्त केली.
शि. द. फडणीस म्हणाले, संमेलनासाठी मी साकारलेल्या बोधचिन्हाचे अनावरण माझ्या हस्ते व्हावे हा मोठा योग आहे. व्यंगचित्रकारांना वाटते की, फक्त आम्हीच विनोद करू शकतो; परंतु राजकीय अंगाने विनोद करणारे राजकारणी आज व्यासपीठावर आहेत. त्यामुळे त्यांनी विनोदी लेखनाकडे वळावे अशी मार्मिक सूचनाही केली. शिवकालीन काळात राज्य चालविण्यासाठी फक्त तलवारीच नव्हे तर उत्तम प्रशासनाची गरज होती हे ओळखून छत्रपती शिवाजी महाराज यांनी पेशवे पदाची नेमणूकही सातारहून केली. या लेखणीची व तलवारीची ताकद बोधचिन्हात दर्शविली जावी आणि लेखणीतून साहित्य निर्मितीसह सामाजिक दंभ, ढोंगबाजीवर तलवारीप्रमाणे वार व्हावा हे सूचित करण्याचा प्रयत्न केला आहे.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, संमेलनापासून दूर गेलेले साहित्य रसिक संमेलनाकडे परत यावेत या करिता प्रयत्न होणे आवश्यक आहे. मराठी भाषेचा अभ्युदय सातऱ्यातूनच झाला आहे. शासनाची इच्छा असल्यास मराठी भाषेचे नक्कीच भले होऊ शकते. संमेलनाकरिता निधी संकलन करताना फक्त लक्ष्मीचीच पूजा न होता सरस्वतीची पूजा देखील अग्रक्रमाने व्हावी अन्यथा सरस्वतची वीणा क्षीण होईल. राजकीय इच्छाशक्ती प्रबळ असल्यास मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतर केंद्र सरकारकडून मिळणारा निधी वाटपातील असमानता दूर करून मराठी भाषेच्या विकासासाठी पोहचणे गरजेचे आहे. सातारा येथे होणारे साहित्य संमेलन अधिक स्वायत्त, साहित्याभिमुख तसेच लोकाभिमुख व्हावे अशी अपेक्षाही व्यक्त केली.
स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, सातारा जिल्ह्याला साहित्यिकांची मोठी परंपरा लाभली आहे याचा अभिमान आहे. साहित्य महामंडळाने 33 वर्षांनंतर साताऱ्याला संमेलनाची संधी दिली त्यामुळे सातारकर देखील या संमेलनासाठी उत्सुक आहेत. हे संमेलन उत्तम पद्धतीने यशस्वी करून सातारचा ठसा या संमेलनात आणि मराठी साहित्य क्षेत्रात नक्कीच उमटवू.
प्रास्ताविकात बोधचिन्हाविषयी माहिती देताना विनोद कुलकर्णी म्हणाले, मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या साताऱ्याचे महत्त्व बोधचिन्हातून प्रकट करण्यात आले आहे. मराठी भाषेवर अत्याचार होऊ नये तसेच इतर भाषांचे अतिक्रमण होऊ नये त्या करीता लढा दर्शविणारे बोधचिन्ह साकारण्यात आले आहे.
मान्यवरांचे स्वागत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारच्या पेढ्यांचा हार घालून केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले तर आभार सुनिताराजे पवार यांनी मानले.
हास्यविनोदात रंगला सोहळा
शिवेंद्रसिंहराजे भोसले – उदय सामंत यांच्या गावी जाऊनही त्यांची भेट झाली नाही याचे मनात दु:ख होते परंतु या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांची प्रत्यक्ष भेट झाली याचा आनंद आहे.
शिवेंद्रसिंहराजे भोसले – हा राजकीय सोहळा नाही. राजकीय सोहळ्याप्रमाणे एकाच हाराने सत्कार न करता दोन्ही पाहुण्यांसाठी वेगवेगळे हार आणले आहेत.
उदय सामंत – सत्कारासाठी दोन वेगवेगळे हार आणले आहेत, हे मलाही समजले. माझा हार माझ्या वाहनात पोहोचला असून त्यातील पेढे मी रात्री खाणार आहे.
प्रा. मिलिंद जोशी – पुणेकर नुसतेच गोड बोलतात परंतु सातारकर गोड बोलत नाहीत तर गोड पेढे देऊन काम करवून घेतात. सत्कारासाठी आणलेल्या हारातील पेढे सातारच्या मोदींचे आहेत, हे मात्र कुणी सांगत नाहीत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...