मुंबई,: एनडीएचे उमेदवार व महाराष्ट्राचे माजी राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन यांच्या भारताच्या उपराष्ट्रपतीपदी झालेल्या निवडीबद्दल विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या अभिनंदन संदेशात म्हटले आहे, “आपला दीर्घ राजकीय व प्रशासकीय अनुभव, जनसेवेसाठीचे कार्य व लोकशाही मूल्यांबद्दलची निष्ठा या गुणांमुळे देशाच्या सर्वोच्च पदावर काम करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून केलेली आपली सेवा राज्यातील जनतेसाठी लक्षात राहणारी ठरली आहे.”
तसेच त्यांनी नमूद केले की, “मा. राधाकृष्णन हे केवळ एक प्रख्यात विद्वान, उत्तम मार्गदर्शक व उत्कृष्ट वक्तेच नाहीत, तर संसदीय व विधिमंडळ अभ्यास विषयांचे तज्ज्ञ आहेत. त्यांच्या भाषणांना उपस्थित राहण्याची आणि विविध कार्यक्रमांत ऊपसभापती या नात्याने सहभागी होण्याची संधी मला लाभली, ही माझ्यासाठी मोठे भाग्य आहे.”
डॉ. गोऱ्हे यांनी पुढे विश्वास व्यक्त केला की, “उपराष्ट्रपती या पदावर आपण आपल्या कर्तृत्व, दूरदृष्टी व सेवाभावाच्या बळावर संसद व लोकशाही प्रक्रियेला अधिक सक्षम, न्याय्य व लोकाभिमुख बनवाल.”
त्यांनी श्री. राधाकृष्णन यांच्या पुढील कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

