पुणे: ग्रामीण भागातील गरजू व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना समान संधी, त्यांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य उपलब्ध व्हावे, यासाठी ‘समावेश’ संस्थेने घेतलेला पुढाकार महत्वाचा आहे. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील समन्वय वाढला, तर शिष्यवृत्ती योजनेतील अडचणी दूर होतील. सारथी, स्वयंम स्वाधार, महाज्योती, महाडीबीटी या माध्यमातून मिळणाऱ्या शिष्यवृत्त्या लवकर मिळतील, असे प्रतिपादन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विलास लोंढे यांनी केले.
नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशनतर्फे (एनपीडब्ल्यूए) ‘समावेश: ॲक्शन फॉर इम्पॅक्ट’ संस्थेच्या सहकार्याने आयोजित शिष्यवृत्ती सहाय्य कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी विशाल लोंढे बोलत होते. एमसीई सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी तांत्रिक शिक्षण संचालनालयाचे सहाय्यक संचालक मारोती जाधव, एमसीई सोसायटीचे सचिव इब्रान शेख, ‘समावेश’ संस्थेचे संस्थापक प्रविण निकम, ‘एनपीडब्ल्यूए’चे अध्यक्ष सचिन कोतवाल, उपाध्यक्ष अमोल शाह, प्रवीण जावळे आदी उपस्थित होते.
विशाल लोंढे म्हणाले, “शिक्षकाला विद्यार्थी दत्तक दिला, तर त्यांचे प्रश्न सुटतील. विद्यार्थी कोणत्याही प्रवर्गातील असला, तरी प्रवेश घेताना सर्व कागदपत्रे शिक्षकांनी पाहावीत. त्याची पडताळणी करावी. ‘समावेश’सारखी संस्था फार्मा असोशिएशनच्या विविध महाविद्यालयांमध्ये स्वतः येऊन साहाय्य करत आहे. त्यांच्या या मदतीचा पुरेपूर फायदा करून घेत मुलांना शासनाच्या विविध शिष्यवृत्तीचा अधिकाधिक लाभ करून देण्यासाठी सकारात्मक विचार करायाला हवा.”
प्रवीण निकम म्हणाले, “विद्यार्थ्यांना विचारक्षम, सजग आणि न्यायाभिमुख नागरिक घडवणे हे ‘समावेश’चे ध्येय आहे. त्यासाठी ‘समावेश’ची टीम शिक्षणाचा मूलभूत हक्क आणि मूलभूत न्यायतत्व यामध्ये संशोधन आणि कृतीशील कार्यक्रम करते. विद्यार्थ्यांना शिक्षण, कायदेशीर ओळखपत्रे आणि शिष्यवृत्ती उपलब्ध करून देण्यासह शासनाच्या योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी संस्था कार्यरत आहे. आतापर्यंत २००० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले आहे.”
पुढील तीन वर्षे हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी ‘एनपीडब्ल्यूए’ने ‘समावेश’ संस्थेसोबत सामंजस्य करार केला. डॉ. व्ही. एन. जगताप यांनी स्वागत, तर प्रा. प्रविण जावळे यांनी प्रास्ताविक केले. सचिन कोतवाल यांनी ‘एनपीडब्ल्यूए’ची माहिती दिली. डॉ. संपत नवले यांनी आभार मानले. प्रा. तस्लिम कुरेशी यांनी सूत्रसंचालन केले.

