पुणे-राज्य विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्यात आलेल्या जनसुरक्षा विधेयकाविरोधात महाविकास आघाडीकडून राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. शहरी नक्षलवादाचा बीमोड करण्याच्या नावाखाली विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठी हे विधेयक मंजूर करण्यात आले, असा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आंदोलन खासदार सुप्रिया सुळे यांचे नेतृत्वात सुरू करण्यात आले आहे. पुणे स्टेशन जवळील महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ संविधानाचा जयजयकार करत सरकारच्या हुकूमशाही प्रवृत्तीचा निषेध करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राज्य प्रवक्ते महेश तपासे, RPI चे नेते सचिन खरात, विशाल तांबे, मनाली भीलारे, शेखर धावडे, डॉ.निकिता गायकवाड, मंजिरीं घाडगे, श्रधा जाधव,पायल चव्हाण, फईम शेख, युसुफ शेख, नरेश पगाडल्लू, वंदना मोडक, शैलेंद्र बेल्हेकर, सागर खांदवे व मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय संविधानाचा विजय असो, जनसुरक्षा कायदा रद्द करा, अशा घोषणाबाजी करत राज्यभर हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. पुण्यात आंदोलनावेळी माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाविकास आघाडीमध्ये तुम्हाला आठवत असेल जेव्हा माननीय उद्धवजी स्वतः असेंब्लीमध्ये आले होते त्यावेळेस कॉंग्रेस असेल, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गट असेल आम्ही सगळ्यांनी मिळून हा कायदा आणला होता, तेव्हा सगळ्यांनीच याचा विरोध केला होता. मला एकाच गोष्टीचे आश्चर्य वाटते की एकीकडे हे सरकार सातत्याने सांगत आहे की हे या देशातून नक्षलवाद संपवला असे हे केंद्र सरकार नाहीतर राज्यातील सरकार सांगत आहे. तर मग नक्षलवादाच्या विरोधात आधीच आपल्याकडे कायदे असताना आणखी एक कायदा कशासाठी? असा सवाल सुळे यांनी उपस्थित केला.
पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, सगळ्या समाजात अशी एक चर्चा आहे की हा फक्त की असे कायदे आणून संविधानाच्या विरोधी घेतलेला हा निर्णय आहे. हा देश कोणाच्या मन मर्जी चालणार नाही. हा देश फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालणार आणि म्हणून या विधेयकाचा महाविकास आघाडी म्हणून तर आहेच पण जबाबदार नागरिक या नात्याने विरोध करू. आमची विनंती आहे हे विधेयक मागे घेण्यात यावे.
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवर प्रश्न विचारण्यात आला असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, गुप्त मतदान असताना मग कसे कळणार की त्यात कोणत्या पक्षाने क्रॉस व्होटिंग केले? वायएसआर कॉंग्रेस हा पक्ष इंडिया आघाडीत नाही. तुम्हाला कसे माहीत आहे की गुप्त मतदान असताना कोणती मते फुटली हे कसे समजेल? असे आरोप जर केले जात आहेत तर राहुल गांधी जे म्हणतात ते खरेच आहे व्होट चोरी झाली. मला माहीत नाही कोणाची मते फुटली. 15 मते अवैध आहेत आणि त्यातली 10 मते त्यांची असल्याचे त्यांनीच कबूल केले आहे.
दरम्यान, जनसुरक्षा विधेयक हे दडपशाही आणि हुकूमशाही प्रवृत्तीचे असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. हे विधेयक म्हणजे सरकारविरोधातील आवाज दडपण्यासाठी वापरले जाणारे एक ‘अस्त्र’ आहे, अशी भीतीही काँग्रेसने व्यक्त केली आहे. काँग्रेसच्या मते, सध्या नक्षलवादाशी संबंधित कायदे पुरेसे कठोर आहेत. त्यामुळे वेगळ्या कायद्याची गरज नाही. या नव्या विधेयकानुसार कोणत्याही व्यक्तीला अटक करण्याचा, तुरुंगात टाकण्याचा आणि त्यांची संपत्ती जप्त करण्याचा अधिकार सरकारला मिळेल. यामुळे विरोधकांचा आवाज दडपला जाण्याची शक्यता आहे, असे काँग्रेसने त्यांचे प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे.

