संगनमत करून ६०० मतपत्रिका चोरून लपवून ठेवल्याचा आरोप
मुंबई दि. ०९ :
मतचोर म्हणून राजकारण्यांना बोलले जाते, पण ही व्होटचोरी आता मुंबई मराठी साहित्य संघाच्या निवडणुकीत सुरू आहे. संघातील कर्मचारी आणि निवडणूक अधिकारी यांच्याशी संगनमत करून ६०० सदस्यांच्या मत पत्रिका चोरून लपवून ठेवल्या आहेत. योग्य वेळी त्या पेटीत टाकायच्या,असे कारस्थान सुरू आहे. तसेच मतदारांना आता ‘ डुप्लिकेट ‘ मत पत्रिका दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप डॉ.भालेराव विचार मंच पॅनलच्या उमेदवारांनी डॉ. उषा तांबे यांच्या ‘ऊर्जा’ पॅनलवर केला आहे. निवडणुकीचा कंत्राटदार आणि निवडणूक अधिकारी यांची फौजदारी चौकशी व्हावी, अशी मागणीही भालेराव पॅनलने केली आहे.
गिरगाव येथील मुंबई मराठी साहित्य संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सुरू असलेल्या मनमानी कारभाराबाबत ही निवडणूक लढविणाऱ्या डॉ.भालेराव विचार मंच पॅनलचे उमेदवार प्रा.नरेंद्र पाठक, प्रमोद पवार, दिवाकर दळवी, अनिल गजके, सारंग दर्शने यांनी मंगळवारी मुंबई मराठी पत्रकार संघात परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला.
निवडणुका जाहीर होण्यापूर्वी मतदार यादी अद्यावत करणे गरजेचे होते. मात्र संघाच्या कार्यवाह डॉ.अश्विनी भालेराव यांनी त्याची काही आवश्यकता नसल्याचे सांगत आमची सूचना दुर्लक्षित केली. आम्ही ४०० रुपये भरून यादी घेतली. त्यातील १३१५ मतदारांना आमचा जाहीरनामा पाठविला. सदस्य यादी अद्यावत नसल्यामुळे ३४५ पत्रे परत आली. मतदारांकडे चौकशी केली असता त्यांना अदयाप मत पत्रिका मिळालेल्या नाहीत. ऊर्जा पॅनलचे डॉ. उषा तांबे, डॉ. भालेराव, भागवत, मेहेंदळे, हिंगलासपूरकर, केंकरे व इतर उमेदवारांनी निवडणूक अधिकारी ऍड. यशोधन दिवेकर आणि संघातील कर्मचारी यांच्याशी संगनमत करून ६०० मत पत्रिका लपवून ठेवल्या आहेत. योग्य वेळी ही मत पेटीत टाकायची कारस्थान रचण्यात आले आहे. मत पत्रिकेचे कंत्राट ज्या खासगी एजन्सीला देण्यात आले त्या एजन्सीने प्रत्यक्षात मतपत्रिका न पाठविता केवळ बुकिंग रिसिट साहित्य संघात जमा केली. हा फौजदारी स्वरूपाचा आर्थिक घोटाळा असून त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही डॉ.भालेराव विचार मंच पॅनलचे प्रमोद पवार यांनी केली आहे.

