मुंबई-भारताचा शेजारी देश असलेल्या नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या बंदीच्या निर्णयामुळे नेपाळ सरकारला जनतेच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागत आहे. या अभूतपूर्व जनक्षोभामुळे नेपाळमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून, अखेर पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. नेपाळमधील या घडामोडींवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला एक इशारा दिला आहे.
संजय राऊत यांनी नेपाळमधील परिस्थितीचा दाखला देत, अशी परिस्थिती कोणत्याही देशात उद्भवू शकते, असे म्हटले आहे. आपल्या ट्विटमध्ये राऊत यांनी म्हटले आहे की, “Nepal today! ये स्थिती किसी भी देश मे पैदा हो सकती है! सावधान! भारत माता की जय! वंदे मातरम!”, यासोबतच त्यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग केले आहे. या ट्विटसोबत त्यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला असून, “आपल्या हक्कांसाठी जागा झालेला युवक असा दिसतो,” असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे केंद्र सरकारवर टीका केली आहे.
दरम्यान, नेपाळमध्ये अर्थमंत्र्याला रस्त्यावर पळवू पळवू मारले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संजय राऊत यांनी दुसऱ्या एका ट्विटमध्ये हा व्हिडिओ शेअर करत, ही घटना कोणत्याही देशात होऊ शकते, असा इशारा दिला आहे. या ट्विटमध्ये संजय राऊत यांनी भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनाही टॅग केले आहे.
नेपाळमध्ये सोमवारी सोशल मीडियावरील बंदी आणि भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन झाले, यावेळी पोलिसांनी गोळीबार केला, ज्यामध्ये 19 जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर तरुणांचा रोष वाढला आणि आंदोलन आणखी तीव्र झाले.
या हिंसक निदर्शनांमुळे नेपाळमधील परिस्थिती सतत बिकट होत चालली आहे. निदर्शकांनी संसद भवनाला आग लावली. याशिवाय, पंतप्रधान ओली, राष्ट्रपती, गृहमंत्री यांच्या खाजगी निवासस्थानांची तोडफोड केल्यानंतर जाळपोळ करण्यात आली. माजी पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड, शेर बहादूर देउबा आणि दळणवळण मंत्री पृथ्वी सुब्बा गुरुंग यांच्या खाजगी निवासस्थानांनाही आग लावली.
माजी पंतप्रधान, अर्थमंत्र्यांना मारहाण
निदर्शकांनी माजी पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांना घरात घुसून मारहाण केली. त्याच वेळी, अर्थमंत्री विष्णू पोडोल यांना काठमांडू येथील त्यांच्या घराजवळ पाठलाग करून मारहाण करण्यात आली.
आतापर्यंत 22 मृत्यू, 400 जखमी
या हिंसक घटनांमध्ये, पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी राजीनामा दिला आहे. लष्कराने त्यांना हेलिकॉप्टरने अज्ञातस्थळी नेले आहे. या हिंसाचारात आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 400 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
युती सरकार तुटण्याचा धोका वाढला
प्रचंड दबावादरम्यान, नेपाळमध्ये युती सरकार तुटण्याचा धोका वाढला आहे. शेर बहादूर देउबा यांची नेपाळी काँग्रेस 88 जागांसह आणि केपी शर्मा ओली यांची सीपीएन (यूएमएल) 79 जागांसह जुलै 2024 पासून देशात एकत्रितपणे सरकार चालवत आहेत. आतापर्यंत सर्व राजीनामे नेपाळी काँग्रेसच्या नेत्यांनी दिले आहेत.

