पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने त्यांचा मुलगा आयुष कोमकरवर गोळ्या झाडून त्याची हत्या केली. आयुष कोमकर हा क्लासमधून परत येत असताना अमन पठाण आणि यश पाटील या दोघांनी त्याच्यावर गोळीबार केला.या प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह सहा जणांना अटक केली आहे. हे सर्व जण बुलढाण्याला पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. अटक केलेल्यांमध्ये बंडू आंदेकरची मुलगी आणि दोन नातवांचाही समावेश आहे, अशी माहिती समोर आली आहे.
आयुष कोमकर हत्या प्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर यांच्यासह एकूण 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये माजी नगरसेवक लक्ष्मी आंदेकरसह आणखी एका महिलेचा देखील समावेश आहे. आयुषची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने दोघांना अटक केली होती. यात यश पाटील आणि अमित पाटोळेचा देखील समावेश होता. आता आणखी सहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पहाटेच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचत सहा जणांना अटक केल्याचे सांगितले जात आहे. अटक केलेल्यांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत.
गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर (वय 60), कृष्णा उर्फ कृष्णराज सूर्यकांत आंदेकर (वय 41), शिवम उर्फ शुभम सूर्यकांत आंदेकर (वय 31), अभिषेक उदयकांत आंदेकर (वय 21), शिवराज उदयकांत आंदेकर (वय 29), लक्ष्मी उदयकांत आंदेकर (वय 60), वृंदावनी निलंजय वाडेकर (वय 40), तुषार निलंजय वाडेकर (वय 26), स्वराज निलंजय वाडेकर (वय 22), अमन युसुफ पठाण उर्फ खान, सुजल राहुल मेरगु (वय 23), यश सिद्धेश्वर पाटील आणि अमित प्रकाश पाटोळे (वय 19) अशा 13 जणांचा समावेश आहे.
मागील वर्षी 1 सप्टेंबर रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. या प्रकरणात सोमनाथ गायकवाड, अनिकेत दूधभाते, संजीवनी कोमकर (वनराज आंदेकर यांची बहीण), तिचे पती जयंत कोमकर, आणि दीर गणेश कोमकर यांच्यासह 16 आरोपींना अटक करण्यात आली होती.
आता या हत्येचा बदला घेण्यासाठीच गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकर याचा खून करण्यात आला आहे. 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास आयुष नाना पेठेतील एका सोसायटीत क्लासवरून दुचाकीवरून आला. तो पार्किंगमध्ये पोहोचल्यावर त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.

