पुणे- अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेताना फोटो असणारी एक जाहिरात नुकतीच विविध वर्तमान पत्रांतून आणि टीव्हीवरील विविध वाहिन्यांवरून झळकली आहे. त्यात फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांपुढे नतमस्तक झाल्याचे दिसून येत आहेत. या जाहिरातीत ती देणाऱ्यांचे नाव नाही, या अनामिक जाहिरातीसाठी सुमारे ४०० कोटी रुपये खर्च झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. या बेनामी खर्चाचा शोध आणि हिशेब घेणार कोण ? असा सवाल करत फडणवीस यात मॉडेल आहेत कि मुख्यमंत्री म्हणून आहेत याचा खुलासा त्यांनी करायला हवा असे आम आदमी पार्टीचे प्रवक्ते विजय कुंभार यांनी म्हटले आहे .
कुंभार यांनी असेही म्हटले आहे कि,’या जाहिरातींची देवेंद्र फडणवीस यांना रॉयल्टी मिळालेली आहे का? त्यांचा फोटो मुख्यमंत्री म्हणून वापरलेला दिसत नाही तर खाजगी व्यक्ती म्हणून वापरल्यासारखा वाटत आहे. ते पूर्वी मॉडेल होते असं म्हटलं जातं. त्यामुळे कदाचित त्यांची परवानगी घेऊन फोटो वापरला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.परंतु पदावर असताना असं करता येतं का?ही जाहिरात नक्की कोणत्या उद्देशाने आणि कोणी दिली? काहीच अर्थबोध होत नाही.मुख्यमंत्र्यांचा फोटो वापरून करोडोंच्या निनावी जाहिराती होत आहेत आणि त्यांच्या मागे कोण आहे हे समजत नसेल तर ते धोकादायक आहे.जर फोटो परवानगी घेऊन वापरला असेल, तर तो कोणी वापरला, का वापरला हे स्पष्ट व्हायला हवं.अशा जाहिराती सर्वत्र म्हणजे राज्यभरातील वर्तमानपत्रे. होर्डिंग्ज,पोर्टल्सवर करण्यात आलेल्या आहेत, त्यावर करोडोंचा खर्च करण्यात आला आहे.असा खर्च निनावी होणं योग्य नाही त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याचा शोध घेतला पाहिजे.

