पुणे : गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्याच्या हेतूने आंदेकर टोळीने वनराज च्या हत्या प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याची हत्या करून बदल घेण्यास प्रारंभ केला . आयुष कोमकर क्लासमधून आपल्या घरी आला होता. यावेळी त्याच्यावर झालेल्या गोळीबारात आयुषचा मृत्यू झाला. आयुषच्या पार्थिवावर आज तीन दिवसांनंतर अंत्य संस्कार करण्यात आले. कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करता आयुषच्या अंत्यविधीसाठी केवळ त्याच्या वडिलांना हजर राहण्यासाठी परवानगी मिळाली होती.
वनराज आंदेकर हत्या प्रकरणात आयुषचे आई-वडील दोन्ही जेलमध्ये आहेत. आयुषचे वडील गणेश कोमकर याला परवानगी मिळाल्यानंतर त्याला पोलिसांच्या बंदोबस्तात नागपूर कारागृहातून पुण्यात आणण्यात आलं. तसेच पुण्यात गणेश विसर्जनामुळे पोलिसांवर ताण होता. यामुळे आयुषच्या अंत्यविधीला तीन दिवस विलंब झाला. त्यानंतर अखेर आज आयुषच्या पार्थिवावर अंत्य संस्कार करण्यात आले.आयुष कोमकर याच्या पार्थिवावर पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्य संस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा वैकुंठ स्मशानभूमीच्या परिसरात तैनात करण्यात आला होता. आयुषच्या अंत्यविधीला त्याचे वडील गणेश कोमकर येणार असल्याने आंदेकर गटाकडून घातपात केला जाऊ शकतो, असा अंदाज पोलिसांना होता. त्यामुळे पोलिसांचा प्रचंड मोठा फौजफाटा स्मशानभूमी परिसरात तैनात होता. कोणत्याही प्रकारची घातपाताची घटना घडणार नाही, याची पोलिसांकडून पूर्ण तयारी करण्यात आली.
आयुषचं पार्थिव आज ससून रुग्णालयातून वैकुंठ स्मशानभूमीत आणण्यात आलं. पण त्याचे वडील गणेश कोमकर याच्या येण्याची प्रतीक्षा करण्यात आली. गणेश कोमकर याच्यासाठी शेवटचा अंत्यविधी काही काळासाठी थांबवण्यात आला. यावेळी कोमकर कुटुंबीयांसाठी वैकुंठ स्मशानभूमीत कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली. दोन पोलीस उपायुक्त प्रत्यक्ष उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवत होते. संवेदनशील परिस्थितीत जमाव नियंत्रण करण्यासाठी पोलीस तैनात करण्यात आले होते.आयुषच्या अंत्यविधीवेळी कोमकर कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि मित्र उपस्थित होते. यावळी अत्यंत दुःखद वातावरण होते. आयुषच्या भावडांनी आणि इतर नातेवाईकांना यावेळी टाहो फोडला होता. आयुषचा भाऊ खूप रडत होता. त्याचा आक्रोश सुन्न करणारा होता. या दरम्यान थोड्या वेळाने पेलिसांच्या आणखी काही गाड्या दाखल झाल्या. यापैकी एका पोलीस व्हॅनमधून गणेश कोमकर बाहेर पडला. त्याच्या आगमनानंतर आयुषच्या पार्थिवावर अंत्य संस्काराचे विधी पूर्ण करण्यात आले. यावेळी आयुषचे वडील गणेश कोमकर यांनी त्यास अखेरचा निरोप दिला. अंत्यविधीवेळी पोलिसांनी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर विशेष काळजी घेतलेली बघायला मिळाली.

