विजय पांढरेंचा गंभीर आरोप
मुंबई-अजित पवार हे राज्यातील सिंचन घोटाळ्याचे खरे सूत्रधार होते. त्यावेळी उच्चस्तरीय चौकशी नेमून त्यांच्यावर कारवाई केली असती तर अजित पवार तुरुंगात गेले असते, असे वक्तव्य विजय पांढरे यांनी केले आहे. कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या काळात विजय पांढरे हे जलसंपदा विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता होते. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांचे पाप लपवले आणि त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठिंबा दिला असल्याचा आरोप पांढरे यांनी केला आहे.
विजय पांढरे यांनी समाज माध्यमावर एक व्हिडिओ पोस्ट करत अजित पवारांवर आरोप केले आहेत. विजय पांढरे म्हणाले, अजित पवार हे सिंचन घोटाळ्याचे सूत्रधार होते. त्याप्रकरणी त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यावेळी कॉंग्रेसने अजित पवारांची चौकशी लावण्याचा प्रयत्न केला तर सरकार पाडण्यात आले. जलसिंचन खात्यातील घोटाळ्याच्या चौकशीसाठी माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने एक समिती नेमली होती. पण त्यावेळी चितळेंनी पळपुटेपणा केला. त्यांनी अहवालात गोष्टी होत्या तशा नीटपणे मांडल्या नाहीत. त्यामुळे सरकारला या प्रकरणात संधी मिळाली, असे पांढरे यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना विजय पांढरे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना सिंचन घोटाळ्याच्या प्रकरणात क्लीनचिट देण्याचे काम केले. सिंचन घोटाळ्यात अजित पवारांना पाठीशी घालणारी दुसरी व्यक्ती म्हणजे नरेंद्र मोदी. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यात क्लीनचिट दिल्याची लेखी माहिती नागपूर खंडपीठासमोर दिली. मात्र, अद्याप नागपूर खंडपीठाने ती क्लीनचिट मान्य केलेली नाही. सध्या या प्रकरणाची सुनावणी होत नाही, ही खरी अडचण असल्याचे पांढरे यांनी म्हटले आहे.
माधवराव चितळे समितीने जलसिंचन घोटाळ्याच्या अहवालात भ्रष्टाचाराबाबत पुरेशा गोष्टी नमूद केल्या होत्या. माधवराव चितळे यांनी एका मुलाखतीत बोलताना सांगितले होते की, या प्रकरणात चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशी नेमली पाहिजे, अशी माहिती विजय पांढरे यांनी दिली आहे. तसेच सरकारने चितळे समितीचा अहवालही लपवून ठेवला. चितळे यांनी म्हटले होते की मी दिलेल्या अहवालानुसार कारवाई केली तर अजित पवार जेलमध्ये जातील. मात्र अजित पवारांचे जलसिंचन घोटाळ्याचे काम लपवण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले यात शंका नाही, असा आरोप पांढरे यांनी केला आहे.

