पुणे-
गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान दोन ढोल ताशा पथक यांच्याकडून पत्रकारांसोबत गैरवर्तन झाल्याचा प्रकार घडला होता. या पार्श्वभूमीवर पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची सोमवारी भेट घेतली. यावेळी पत्रकार यांच्या वार्तांकनाबाबत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पुणे पोलीस आयुक्त यांनी पत्रकारांना वार्तांकन योग्य प्रकारे करता येईल तसेच पत्रकारांची सुरक्षा देखील राहील याची पुरेशी काळजी आगामी काळात घेऊ असे आश्वासन शिष्टमंडळास त्यांनी दिले. यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले, खजिनदार दिलीप तायडे यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, विसर्जन मिरवणुकी दरम्यान ढोल ताशा पथक यांचे नियमन करण्यासाठी आगामी काळात विशिष्ट कार्यपद्धती (एसओपी) तयार केली जाईल. पथकातील सदस्य संख्या मर्यादित राहावी यासाठी ढोल ताशा पथक संघटना आणि गणेश मंडळे यांना देखील सूचना दिल्या जातील. महिला पत्रकाराचा विनयभंग झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई देखील तात्काळ करू असे आश्वासन शिष्टमंडळास त्यांनी दिले. पत्रकारांना वार्तांकन करण्यासाठी जे पोलीस पासेस दिलेले असतात त्यानुसार, नियमित वार्तांकन करण्याची मुभा देखील असते याची कल्पना संबंधितांना दिली जाईल असे त्यांनी सांगितले. भविष्यात योग्य प्रकारे वार्तांकन पत्रकारांना करता यावे यादृष्टीने कार्यक्रमांपूर्वीच योग्य प्रकारे चर्चा विनिमय करून आवश्यक त्या उपाययोजना राबवल्या जातील असे देखील त्यांनी सांगितले.

