कोणार्क (ओडिशा) : महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या सध्या ओडिशा दौऱ्यावर असून त्यांनी कोणार्क सूर्य मंदिराचे दर्शन घेतले. यावेळी मंदिराच्या इतिहास, शिल्पकला व सांस्कृतिक वारशाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “कोणार्क मंदिरातील हजारो शिल्प, प्रभात सूर्याचे अप्रतिम चित्रण, हत्तींची सुमारे दोन हजार शिल्पे आणि महिलांच्या, सामान्य जनतेच्या तसेच राजघराण्यांच्या जीवनाशी संबंधित शिल्पकला हे भारतीय संस्कृतीचे अनमोल वैभव आहे.”
डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, १९०१ साली ब्रिटिशांच्या लक्षात आलेले हे मंदिर तेव्हा ‘पॅगोडा’ म्हणून ओळखले जात होते. नंतर त्याचे खरे स्वरूप समोर आले. १९८४ मध्ये भारत सरकारने या मंदिराचा संपूर्ण कारभार पुरातत्त्व विभागाकडे सोपविला. महाराष्ट्रातुन मराठा राजे ओरिसात आले तेंव्हा मंदिराची मोठ्या प्रमाणात भग्नावस्था झाल्याचे पाहुन कोणार्क मंदिरातील ‘अरुण स्तंभ’ त्यांनी जगन्नाथ पुरी येथे श्री जगन्नाथ मंदिरात हलविला होता असेही तेथील गाईडने आम्हाला सांगितले.
“आपल्या पूर्वजांनी केलेल्या या कर्तृत्वाचा अभ्यास इथल्या लोकांनी उत्तम रीतीने जपून ठेवला आहे. तो पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. तसेच आज आपण जे कार्य करत आहोत, त्याचा इतिहासात काय ठसा उमटणार आहे, याचाही विचार इथे आल्यावर मनात जागृत होतो,” असे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी भारत सरकारच्या जी-२० परिषदेच्या वेळी या मंदिराचा घेतलेला संदर्भ व त्यातून परराष्ट्र संबंध दृढ करण्याच्या झालेल्या प्रयत्नांचाही उल्लेख केला.

