मुंबई- केंद्र सरकार ने वस्तू व सेवा करात (जीएसटी) केलेल्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या सुधारणेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, देशाच्या व्यापार क्षेत्राला मोठ्या प्रमाणात फायदा होऊन, नवीन रोजगार निर्मिती होईल, सर्वसामान्य जनतेवरचा बोजा कमी होईल असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते जफर इस्लाम यांनी सोमवारी व्यक्त केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रदेश प्रवक्ते ओमप्रकाश चौहान उपस्थित होते.
श्री. इस्लाम म्हणाले की, 2014 साली जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा युपीए सरकारच्या कृपेने अर्थव्यवस्था डबघाईला आली होती, त्यात वाढ होण्याची चिन्हे नव्हती,धोरण लकवा, भ्रष्टाचार आणि महागाई गगनाला भिडली होती. करसंकलानाची प्रक्रिया क्लिष्ट होती, पारदर्शक नव्हती. अशा कमकुवत स्थितीतील अर्थव्यवस्थेला मोदी सरकारने उभारी दिली आहे, जगातल्या सर्वात पाच दुबळया अर्थव्यस्थेतून भारतीय अर्थव्यवस्था ‘टॉप फाइव्ह’ मधील एक बनली आहे, हे मोदी सरकारचे यश आहे. नुकत्याच केलेल्या जीएसटी सुधारणा अर्थव्यवस्थेला अधिक बळ देणार आहेत. सामान्य माणूस आणि मध्यमवर्गीय, त्यांच्या मूलभूत गरजा आणि आकांक्षा हे जीएसटी सुधारणांचे मुख्य केंद्रबिंदू आहेत. जीएसटी दरांच्या सुलभतेमुळे अर्थव्यवस्थेला दीर्घकाळात फायदा होऊन महागाई नियंत्रणात राहण्यासही मदत होईल असे श्री. इस्लाम म्हणाले.
मोदी सरकार विकासाचे राजकारण करणार
जीएसटी दर कपातीमुळे प्रत्येक राज्यातील जनतेला मग तिथे सरकार कोणाचेही असो, तिथल्या प्रत्येक कुटुंबाला, गरिबांना आणि मध्यमवर्गीयांना, लहानमोठ्या सर्व उद्योजकांना, प्रत्येक व्यापाऱ्याला आणि व्यावसायिकांना मोठा फायदा होणार आहे. जीएसटी सुधारणेर्वरून बीडी आणि बिहार हे दोन्ही शब्द ‘बी’ नी सुरू होणारे आहेत असे कुत्सितपणे म्हणत हिन दर्जाचे राजकारण करणा-या काँग्रेसवर ही त्यांनी ताशेरे ओढले. प्रत्येक मुद्द्याला राजकीय रंग देण्याची घाणेरडी सवय काँग्रेसला जडली आहे. त्यामुळे काँग्रेसला त्यांचे हीन दर्जाचे राजकारण लखलाभ, मोदी सरकार मात्र सर्व वर्गातील जनतेचे भले करण्यासाठी विकासाचे राजकारण करत रहाणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

