पुणे-पुण्यातील अनंत चतुर्दशीच्या गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान बुधवार चौक याठिकाणी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक वार्तांकन करत असताना, एका नवोदित महिला पत्रकाराचा विनयभंग त्रिताल ढोल ताशा पथकाच्या दोन अनोळखी सदस्यांनी केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी पुणे श्रमिक पत्रकार संघाने पुढाकार घेऊन याबाबत पाठपुरावा केल्यानंतर अखेर फरासखाना पोलीस ठाण्यात संदर्भात त्रिताल ढोल ताशा पथकाच्या दोन अनोळखी सदस्यांवर फरासखाना पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 74, 75 (1), 352, 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
यासंदर्भात फरासखाना पोलीस ठाण्यात 20 वर्षीय तरुणीने तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार त्यांच्या एका मित्रासोबत गणपती मिरवणुकीचे वृत्तांकन करण्यासाठी सहा सप्टेंबर रोजी सायंकाळी 7:15 ते 7:40 दरम्यान बुधवार चौक याठिकाणी आल्या होत्या. त्यावेळी त्रिताल ढोल ताशा पथकातील एका 25 वर्षीय अनोळखी व्यक्तीने त्रिताल ढोल ताशा पथकाच्या लोखंडी ट्रॉलीचे चाक तक्रारदार यांच्या पायावर घातले. त्यावेळी तक्रारदार यांनी सदर बाबत त्याला विचारणा केली असता, त्यांनी तक्रारदार यांना धक्काबुक्की केली तसेच त्यांच्या छातीला स्पर्श करून मागे ढकलले त्यामुळे तरुणीच्या मनात लज्जा उत्पन्न झाली.
त्यावेळी त्यांच्यासोबत असणारा मित्र शोएब तडवी यांनी आरोपीला सदर बाबत विचारणा केली. याचा राग येऊन सदर अनोळखी व्यक्तींनी त्यांना ढकलून दिले व त्यातील एकाने तक्रारदार व त्यांच्या मित्राला धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. त्यामुळे याबाबत संबंधित आरोपी विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फरासखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील याबाबत पुढील तपास करत आहे.

