पुणे | महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यंदाच्या पारंपरिक गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला. पुण्याच्या पहिल्या मानाच्या श्री कसबा गणपतीला त्यांनी पुष्पहार अर्पण करून प्रसाद अर्पण केला तसेच दुसऱ्या मानाच्या श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीचे दर्शन घेऊन प्रसाद अर्पण केला.
यावेळी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, “मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी भावनिक बाब आहे. कसबा गणपती व तांबडी जोगेश्वरीच्या कृपेने पुणेकरांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांती नांदो, अशी माझी प्रार्थना आहे. हा उत्सव केवळ भक्तिभावाचा नाही, तर सामाजिक ऐक्य, परंपरेची जपणूक आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोन देणारा आहे. सर्व पुणेकरांनी सुरक्षिततेचे भान ठेवून, भक्तिभावाने आणि आनंदाने उत्सवाचा समारोप करावा.”
यावेळी पुणे उपविभागीय अधिकारी श्री. विठ्ठल जोशी यांनी विशेष विनंती करून डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते कसबा गणपतीला प्रशासनाच्या वतीने हार अर्पण करण्यात आला.
या सोहळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह महापालिका, युवासेना सचिव किरण साळी, शिवसेना उपशहरप्रमुख नितीन पवार तसेच पोलीस आणि महसूल प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मानाच्या कसबा गणपती मंडळाच्या वतीने व तांबडी जोगेश्वरी मंदिर गणेश मंडळाच्या वतीने डॉ. नीलम गोऱ्हे यांचा श्रीफळ व शाल देऊन सत्कार करण्यात आला. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या सामाजिक कार्याचा आणि महिलांसाठी त्यांनी केलेल्या उपक्रमांचा विशेष गौरव केला.

