मुंबई-लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल झाला आहे. थोड्याच वेळात बाप्पाला निरोप दिला जाणार असून, या विसर्जन सोहळ्यासाठी चौपाटीवर गणेशभक्तांनी प्रचंड गर्दी केली आहे. यावर्षी लालबाग राजाच्या विसर्जनासाठी तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक तराफ्यावर मूर्ती चढवताना अडचणी आल्या. परिणामी, लालबागच्या राजाचे विसर्जन लांबले होते. आता मुर्तीला या गुजराती तराफ्यावर बसवण्यात यश आले आहे.
मंडळाचे सचिव सुधीर साळवी म्हणाले, मुंबईत पडत असलेला पाऊस आणि अरबी समुद्राची भौगौलिक परिस्थिती पाहता यावेळी अरबी समुद्राला भरती लवकर आली. लालबागच्या राजाच्या गणपतीचं विसर्जन भरती आणि ओहोटीवर अवलंबून असते. आम्ही इथं पोहोचायच्या अगोदर भरती आली होती. आम्ही एक प्रयत्न करुन बघितला, लालबागचा राजा करोडो भाविकांचं श्रद्धास्थान आहे त्यामुळं तो प्रयत्न थांबवला.
चिंचपोकळीच्या चिंतामणीचं विसर्जन झालं असून लालबागच्या राजाच्य विसर्जन अंतिम टप्प्यात आहे. काही तांत्रिक कारणांमुळे विसर्जनाला उशीर होत असल्याची माहिती आहे.
दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर मुंबईचा लाडका गणपती, लालबागचा राजा, शनिवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास विसर्जनासाठी मंडपातून निघाला. आज, 7 सप्टेंबर रोजी सकाळी पावणेआठच्या सुमारास तो गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. यानंतर आरती होऊन लालबागच्या राजाला तराफ्यावर बसवून समुद्रात विसर्जन केले जाईल अशी अपेक्षा होती. मात्र, समुद्राला आलेल्या भरतीमुळे आणि नियोजनातील त्रुटींमुळे विसर्जन प्रक्रियेत मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

