पुणे-दरवर्षीप्रमाणे शहरातील सर्वात मोठ्या उत्सवादरम्यान स्वच्छ च्या कचरावेचकांनी २० वर्षांहून अधिक काळ पुण्याशी असलेली बांधिलकी जपत ५० हून अधिक विसर्जन घाट आणि केंद्रांवर ‘निर्माल्य टू निसर्ग’ हा उत्सवाला पर्यावरण संवर्धनाची जोड देणारा उपक्रम राबवला. यात दि. २ व ६ सप्टेंबर रोजी कचरा वेचकांनी नागरिकांकडून ११४ टन निर्माल्याचे संकलन व काटेकोरपणे वर्गीकरण केले. त्यासोबतच ३९ टन सुका कचरा स्वतंत्रपणे गोळा केला गेला. संकलित निर्माल्य पुणे महानगरपालिकेकडे खतनिर्मितीसाठी देण्यात आले.
या उपक्रमासाठी शहरभरात स्वच्छचे ४०० हुन अधिक कचरावेचक सज्ज होते. २ व ६ सप्टेंबर रोजी गौरी व गणपती विसर्जनावेळी येणारे फुले, हार, नारळ, दुर्वा यासारखे निर्माल्य आणि प्लॅस्टिकच्या पिशव्या, सजावटीचे साहित्य, मिठाईचे बॉक्स इ. सुका कचरा यांचे वर्गीकरण करून संकलन करण्यात आले. २००९ साली काही निवडक घाटांपासून सुरू झालेला हा उपक्रम, गेल्या पंधरा वर्षांपासून सातत्याने राबविला जात असून आता पुण्याच्या गणेशोत्सवाचा अविभाज्य भाग ठरला आहे.
यावर्षी पु. ना. गाडगीळ आणि सन्स यांनी कचरावेचकांना या उपक्रमासाठी विशेष सहाय्य केले. तसेच, नागरिकांनी, माजी नगरसेवकांनी व गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी देखील ठिकठिकाणी कचरा वेचकांचे आभार मानत, या उपक्रमाचे कौतुक केले व कचरावेचकांना उत्सवात सहभागी करून घेतले.
आपले काम राहील की जाईल, आपल्याला नवीन व्यवस्था आलीच तर त्यात समाविष्ट करून घेतले जाईल की नाही, अशी उपजीविकेवर टांगती तलवार असून देखील, कोणत्याही परिस्थितीत कचरावेचकांनी निर्धाराने शहराप्रती, नागरिकांप्रती आपली बांधिलकी जपत, दोन्ही दिवशी रात्री उशीरापर्यंत विसर्जन केंद्रांवर थांबत निर्माल्य संकलनाचे काम सुरू ठेवले. पुणे महानगरपालिकेने प्रस्तावित केलेल्या घंटा-गाडी आधारित कचरा संकलन प्रणालीमुळे हजारो कचरावेचकांचा रोजगार धोक्यात आहे. या प्रणालीमुळे स्वच्छ सहकारी संस्थेचे मॉडेल संपुष्टात येऊन, कचरावेचक पुन्हा व्यवस्थेतून बाहेर राहतील असा धोका आहे. अशा परिस्थितीतही ‘स्वच्छ’च्या कचरावेचकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साकारण्यासाठी जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे त्यांचा सहभाग यंदा अधिक प्रेरणादायी ठरला.
‘निर्माल्य टू निसर्ग’ हा उपक्रम केवळ निर्माल्य संकलनापुरता मर्यादित नसून, पुण्याचा सर्वात मोठा उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी नागरिक व कचरा वेचक यांच्यातील विश्वासाचे प्रतीक आहे.
__
गणेशोत्सव हा आम्ही नागरिकांसोबत मिळून साजरा करतो. त्यामुळे जरी आमच्या कामाची शाश्वती आम्हाला स्पष्टपणे दिली जात नसली तरी शहरासाठी पुणे मनपाच्या साथीने आम्ही विसर्जन केंद्रांवर उपस्थित होतो. लोक दरवर्षी आम्हाला प्रसाद देतात, आरतीत सामील करतात, रोज दारावर कचरा घेताना घाईमध्ये भेट होते, विसर्जनाच्या वेळी मात्र आम्हाला उत्सवात सहभागी करून घेतले जाते. आपल्या शहराच्या सर्वसमावेशक संस्कृतीचा वारसा जपणारी परंपरा निर्माल्य संकलनाच्या उपक्रमामुळे बळकट झाली आहे.
- सारिका काराडकर, बोर्ड मेंबर, स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्था

