अखिल मंडई मंडळ गणेशोत्सवाचे १३२ वे वर्ष
पुणे : रथाच्या माथ्यावर फडकत असलेला भगवा ध्वज आणि हायड्रोलिक पद्धतीने उंच होत असलेली प्रभू श्रीराम यांची मूर्ती असलेल्या श्री गणेश सुवर्णयान रथात विराजमान होऊन अखिल मंडई मंडळाच्या गणरायाची विसर्जन मिरवणूक थाटात पार पडली. शारदा गणपतीचे दर्शन घेण्यासाठी बेलबाग चौकापासूनच पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती.
मंडळाचे गणेशोत्सवाचे यंदा १३२ वे वर्ष आहे. जहाजासारखे स्वरूप असलेल्या रथाचा आकार २५ फूट लांब आणि १६ फूट रुंद असा होता. रथावर आकर्षक विद्यूत रोषणाई करण्यात आली होती. जहाजाच्या वर सर्च लाईट तसेच आकर्षक कंदील लावण्यात आले होते. मेट्रोच्या लकडीपूल येथील पूलामुळे रथाची उंची कमी करण्यासाठी हायड्रोलिक तंत्रज्ञान वापरण्यात आले होते.
मिरवणूकीच्या अग्रभागी जयंत नगरकर बंधू यांचे नगारावादन त्यामागे गंधर्व बँड तसेच शिवगर्जना पथकाचे वादन मिरवणूकीत झाले.
गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक अनंत चतुर्दशीला मंगळवार, दिनांक ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता मुख्य मंडपापासून निघाली. रात्री ११ च्या दरम्यान मिरवणूकीच्या मुख्य रथाचे आगमन बेलबाग चौकात झाले होते. रविवार दिनांक ७ सप्टेंबर रोजी पहाटे ३.४५ वाजता श्रीं चे विसर्जन झाले.

